
रत्नागिरी वासियांचा हेल्पिंग हँड! अतिवृष्टी बाधित विद्यार्थ्यांना वेळेवर मदतीचा हात, विद्यार्थी गहिवरले
रत्नागिरी : सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने अनेक गावांमध्ये पाणी भरले. या महापुरात शेतीबरोबरच मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले. या पावसाने राज्यभरच मोठ्ठ्या प्रमाणावर नुकसान केले. या पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्यासाठी पुन्हा रत्नागिरीतील विविध सामाजिक संस्थांचे फोरम असलेले हेल्पिंग हॅंडसचे कार्यकर्ते पुन्हा सज्ज झाले आणि रत्नागिरीच्या दातृत्वाला साद घातली. या सादेला मिळालेल्या प्रतिसादातून अनेक रत्नागिरी वासियांनी मदतीचा हात दिला. यात करासल्लगार संघटनेपासून सहभाग दिला. यातून गोळा झालेली ७ लाख ६५ हजार रूपयांची आर्थिक मदत या कार्यकत्यांनी या जिल्ह्यातील कुर्डुवाडी गावातील पुरग्रस्तांपर्यंत पोहोचविली. उच्च शिक्षण घेणाऱ्या १२८ विद्यार्थ्यांसाठी ही मदत देण्यात आली.
सप्टेंबर २०२५ मध्ये मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे सीना नदीला पूर आला. पाऊस आणि पुरामुळे माढा तालुक्यातील सीना नदीच्या पट्ट्यातील (सोलापूर) वीस गावे बाधित झाली. या गावांतील शेतीचे, घरांचे आणि पिकांचे प्रचंड नुकासान झाले. सीना नदी ही दुष्काळी नदी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे त्या नदीला पूरनियंत्रण रेषा नाही. मात्र, अतिवृष्टीत या नदीचे पाणी अनेक गावात शिरले. लोकांना पुराच्या पाण्याचा अंदाज नसल्याने अधिक नुकसान झाले. मागील सत्तर वर्षात एकदाही या या नदीला पूर आला नव्हता.
प्रत्येक संकटाच्या वेळी मदतीसाठी धावून जाणाऱ्या हेल्पिंग हॅंडच्या कार्यकर्त्यांनी या पूरग्रस्तांसाठी धावून जाण्याचा निर्णय घेतला. राजू भाटलेकर आणि वल्लभ वणजू यांची संकल्पना उचलून धरत सेवानिवृत्त विभागीय पोलिस अधिकारी शिरीष सासने, कौस्तुभ सावंत, सुहास ठाकूरदेसाई, प्रमोद खेडेकर, निलेश मलुष्टे, जयंतीलाल जैन, नंदकिशोर चव्हाण, संजय वैशंपायन, आदी हेल्पिंग हॅंडसच्या कार्यकत्यांनी पुन्हा रत्नागिरीच्या दातृत्वाला साद घातली. करसल्लगार संघटना रत्नागिरी जिल्हा, पाटीदार समाज, जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर असोसिएशन रत्नागिरी आणि अनेकांनी महिनाभरात ७ लाख ६५ हजार ६०० रूपयांचा निधी गोळा गेला.
ही मदत वेळेवर योग्य लाभार्थीना गरजेचे होते. या कार्यासाठी हेल्पिंग हॅंडसचे प्रतिनिधी म्हणून शिरीष सासने, कौस्तुभ सावंत, वल्लभ तथा भैय्या वणजू, प्रमोद खेडेकर, संजय वैशंपायन आणि जयेश दिवाणी ३ रोजी पहाटे खासगी वाहनाने कुर्डुवाडीला निघाले. ज्या मुला – मुलींच्या उच्च शिक्षणाचे या महापुराने नुकसान केले होते. अशा १२८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५,८०० रूपयांचे वितरण यावेळी करण्यात आले. चेक व ऑनलाइन पद्धतीने ही मदत देण्यात आली. अथक २४ तास प्रवास करून हे कार्यकर्ते ४ रोजी पहाटे रत्नागिरीत परतले. वेगळा आनंद आणि समाधान घेऊन.
रत्नागिरी पासून दूरवर असणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करणे जटिल कामगिरी होती. यासाठी महत्वाचा दुवा ठरले ते विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णीचे प्राचार्य महेंद्र कदम. वल्लभ वणजू यांच्या संपर्कातून प्राचार्य कदम यांनी कुर्डुवाडीसारख्या दुर्गम पूरग्रस्त झालेल्या गावाच्या नुकसानाची सविस्तर माहिती गोळा केली. सीना नदीकाठील लहानमोठ्या वीस गावातील विविध महाविद्यालयातून खऱ्या अर्थाने गरजू विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्यात आली.या साठी डॉ आशिष राजपूत, माध्यम प्रतिनिधी किरण चव्हाण, प्राचार्य नितीन उबाळे आदी स्थानिक मंडळींनी सहकार्य केले.या सगळ्यांच्या सहकार्यानेच मदतीचा योग्य विनियोग करता आल्याचे हेल्पिंग हॅंडसच्या या कार्यकत्यांनी सांगितले.
पूरबाधित झालेल्या माढा तालुक्यातील विद्यार्थ्यांना एवढ्या मोठ्या रोख रकमेची ही पहिलीच मदत आहे. ही मदत आगदी वेळेवर मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.आपण ही मदत करून आमच्या लोकांत आणि विद्यार्थ्यांमध्ये एक नव चैतन्य निर्माण करण्याचे कार्य केले आहे. अशा शब्दात प्राचार्य कदम यांनी हेल्पिंग हॅंडसचे आभार मानले, आणि भविष्यात या मदतीची परतफेड अशीच गरजूंना मदत करून करणार असल्याचे लाभार्थीनी सांगून रत्नागिरीच्या दिलदार जनतेचे आभार मानले. आजच्या पत्रकार परिषदेला
शिरीष सासने, प्रमोद खेडेकर, कौस्तुभ सावंत, राजू भाटलेकर, जयंतीलाल जैन, नंदू चव्हाण, भूषण बर्वे, संजय वैशंपायन आधी उपस्थित होते




