
देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या कर्जमाफीच्या वचनपूर्तीसाठी पुरवणी मागण्यांमध्ये पाच हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद ?
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या कार्यकाळात जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील सुमारे साडेसहा लाख पात्र शेतकऱ्यांना लाभ देवून वचनपूर्तीसाठी सुमारे पाच हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या मंजूर झाल्यावर या सहा लाख ५६ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळू शकणार आहे.
पात्र असूनही राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होत नसल्याने गेली आठ वर्षे हे शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने या साडेसहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ द्यावा, असे आदेश २०२२ मध्ये देवूनही राज्य सरकारने अद्याप त्याची अंमलबजावणी केलेली नाही. उच्च न्यायालयाने तीन प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना लाभ देण्याचे आदेश दिल्याने केवळ त्या अर्जदारांपुरताच सरकारकडून लाभ देण्यात आला होता.
पहिल्या कर्जमाफीचा आठ वर्षे लाभ नाही
यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन केल्यावर सध्या शासकीय तिजोरीवर ताण असल्याने जून २०२६ मध्ये निर्णय घेण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे. आता नव्याने कर्जमाफीचा विचार होत असताना फडणवीस यांच्या आधीच्याच योजनेतील शेतकऱ्यांना उच्च न्यायालयाने आदेश देवूनही सरकारने लाभ दिलेला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण होवू नये, यासाठी सरकारकडून पुरवणी मागण्यांमध्ये निधी देण्याबाबत विचार सुरू आहे. सहकार खात्याने निधी देण्याचा प्रस्ताव अर्थ खात्याकडे पाठविला आहे.
फडणवीस सरकार २०१४ मध्ये सत्तेवर आल्यावर शेतकरी कर्जमाफीची मागणी सुरु झाली आणि २८ जून २०१७ रोजी ‘ छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजना ‘ जाहीर करण्यात आली. या योजनेत दीड लाख रुपयांपर्यंतची पीक कर्ज माफी देण्यात आली होती आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजार रुपये प्रोत्साहन अनुदान जाहीर करण्यात आले होते. या योजनेत ४४ लाख चार हजार शेतकऱ्यांना सुमारे १८ हजार ५०० कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली होती. तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेवर आल्यावर लगेचच २९ डिसेंबर २०१९ रोजी ‘ महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ‘ जाहीर करण्यात आली होती. या योजनेत दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले होते आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान जाहीर करण्यात आले होते. या कर्जमुक्ती योजनेचा लाभ ३२ लाख शेतकऱ्यांना झाला व त्यासाठी सुमारे २० हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
ऑनलाईन गोंधऴ व निधीही नाही
फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील कर्जमाफी योजनेचे काम दोन-तीन वर्षे सुरु होते. शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज व कागदपत्रे मागविण्यात आली होती. सुरुवातीला अर्जप्रक्रियेत बराच गोंधळ झाला व त्यामुळे विलंबही झाला होता. या साडेसहा लाख शेतकऱ्यांना पात्र ठरविले गेले, पण लोकसभा-विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली व निधीची तरतूद झाली नाही. नंतर ठाकरे सरकार सत्तेवर आल्यावर वेगळ्या कालावधीसाठी नवीन कर्जमाफी योजना जाहीर झाली. त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळात पात्र ठरविलेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांसाठी बँकांना निधी देण्यात आला नाही. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचे महायुती सरकार सत्तेवर आले. या दरम्यान काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापुढे याचिका दाखल केली होती. त्यावर जुलै २०२२ मध्ये उच्च न्यायालयाने या साडेसहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देण्याचे आदेश दिले होते. त्याआधी काही शेतकरी न्यायालयात गेले असताना केवळ त्यांच्यापुरताच लाभ सरकारने दिला होता. त्यामुळे जे शेतकरी न्यायालयात आलेले नाहीत, पण योजनेसाठी पात्र ठरले आहेत, त्यांनाही लाभ देण्यात यावा, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले होते.
त्यामुळे तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री फडणवीस यांनी २०२३ च्या अर्थसंकल्पात या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्याची घोषणा केली होती आणि तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांनीही नागपूर येथील अधिवेशनात तसे सूतोवाच केले होते. या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी सहकार विभागाने प्रस्ताव देवूनही राज्य सरकारने सुमारे पाच हजार ९०० कोटी रुपयांचा निधी दिलेला नाही. फडणवीस व ठाकरे या दोन्ही सरकारांच्या काळात करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेची मुदत संपुष्टात आली आहे. सरकारकडे निधीची चणचण असल्यामुळे पात्र असूनही साडेसहा लाख शेतकऱ्यांसाठी निधी देण्यात येत नसल्याने गेली आठ वर्षे त्यांना नवीन पीक कर्जही मिळू शकलेले नाही.
राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना मदत केली जाईल. पहिल्या कर्जमाफीच्या वचनपूर्तीसाठी सहकार खात्याने पाच हजार ९००कोटी रुपये निधीची तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये करण्याचा प्रस्ताव अर्थ खात्याकडे पाठविला आहे. हा प्रश्न लवकरात लवकर सोडवून योजनेतील उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याचा आमचा प्रयत्न आहे. – बाबासाहेब पाटील, सहकार मंत्री




