
रत्नागिरी जिल्ह्यातील सावित्री खाडीतील आंबेत पूल परिसरात वाळू साठ्यास तीव्र विरोध
रत्नागिरी जिल्ह्यातील सावित्री खाडीतील उमरोली गटातून उपसण्यात आलेली वाळू म्हाप्रळ येथील आंबेत पूल परिसरात साठविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून या प्रस्तावाला स्थानिक नागरिक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नागरिक सेलचे जिल्हाध्यक्ष माजी सभापती भाई पोस्टुरे यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. याबाबत त्यांनी मंडणगडचे तहसिलदार यांना निवेदन दिले आहे. शासन नियम आणि पर्यावरणीय परिणामांचा सविस्तर उल्लेख करत या साठा प्रस्तावास तत्काळ नाकारावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
आपल्या निवेदनात पोस्टुरे यांनी म्हटले आहे की, आंबेत पुल हा नुकताच शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या निधीतून दुरूस्त करण्यात आला असला तरी तो अजून पूर्ण क्षमतेने सक्षम नाही. अशा परिस्थितीत पुलाजवळ वाळू साठा केल्यास जड वाहनांच्या वर्दळीमुळे पुलाला गंभीर धोका निर्माण होईल. आंबेत पूल परिसर हा इको सेंसीटीव्ह झोनमध्ये मोडत असल्याने येथे कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक साठवणीला परवानगी देता येत नाही. उमरोली गटातील वाळू बार्जेस मार्ग वाहून आणली जात असून खाडीतील वळणादर प्रवाहामुळे आंबेत पुलाच्या पिलर्सना धडकण्याची शक्यता आहे. वाळू उपसा आणि साठवणीमुळे नदीतील नैसर्गिक प्रवाह आणि जैवविविधतेवर परिणाम होवून मच्छीमारांची उपजीविका धोक्यात येईल.www.konkantoday.com




