
चिपळूनमध्ये महिला मतदारांची संख्या जास्त असल्याने महिला मतदार ठरवणार नवा नगराध्यक्ष
चिपळूण येथील नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीत शहरातील ४२ हजार ५८२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापैकी २० हजार ९८६ पुरुष आणि २१ हजार ५९६ महिला मतदार असून, महिला मतदारांची संख्या अधिक असल्याने यंदा चिपळूणचा नगराध्यक्ष महिला मतदार ठरवणार आहे. या निवडणुकीत चिपळूणमध्ये थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे, तर शहरात एकूण १४ प्रभाग असून २८ नगरसेवक निवडून येणार आहेत.
प्रांताधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, दि. १० नोव्हेंबरपासून नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. दि. १७ नोव्हेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत आहे. नामनिर्देशनपत्राची छाननी १८ नोव्हेंबरला होणार असून अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. ३० नोव्हेंबर रोजी प्रचाराची मुदत संपणार आहे. २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान, आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी शहरातील युनायटेड इंग्लिश स्कूल येथील गुरूदक्षिणा सभागृह येथे घेण्यात येईल. त्याच ठिकाणी स्ट्रांग रूम तयार करण्यात येणार आहे. मतदानानंतर मतपेट्या तेथे सुरक्षित ठेवण्यात येतील. सकाळी १० वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल आणि दुपारी १ वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. तर निवडणूक प्रक्रिया दि. १० डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com




