
श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानचे जेष्ठ सदस्य मुकेश गुप्ता यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
रत्नागिरी : मंगलमूर्ती प्रतिष्ठान’चे ज्येष्ठ सदस्य व रत्नागिरीतील श्रीराम मंदिराचे मानकरी मुकेश गुप्ता यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त रत्नागिरीत येऊन धडकताच अनेकांनी तीव्र शोक व्यक्त केला.
मुकेश गुप्ता हे बिहारमधील आपल्या मूळ गावी देवदर्शनासाठी सहपरिवार गेले होते. अचानक त्यांच्या छातीत तीव्र कळ आली आणि हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने उपचारासाठी मुंबईत आणण्यासाठी शिकस्तीचे प्रयत्न झाले; परंतु विमान उपलब्ध न झाल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईत आणता आले नाही आणि त्यांचे निधन झाले.
मुकेश गुप्ता हे ‘मंगलमूर्ती प्रतिष्ठान’चे एक ज्येष्ठ सदस्य होते. ते कलेचे जाणकार असल्याने दरवर्षी मंगलमूर्ती सजावट स्पर्धांचा जिल्हास्तरीय सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत ते परीक्षणाचे कार्य करीत. त्यांचा हा रिवाज अनेक वर्षे सुरू होता. तसेच ते रत्नागिरीतील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिर देवस्थानचे मानकरी होते. दरवर्षी रामनवमीला रामजन्माचा सुंठवड्याचा प्रसाद त्यांच्या वतीने देण्यात येत असे.
मुकेश गुप्ता हे एक कोकणातील नामवंत उद्योजक म्हणून परिचीत होते. शांत व हसतमुख स्वभाव आणि उमदे व्यक्तीमत्त्व यामुळे ते अजातशत्रू म्हणून ओळखले जात. त्यांचा लोकसंग्रह मोठा होता. भाजपच्या उत्तर भारतीय आघाडीचे ते जिल्हाप्रमुख होते. त्यांचे पार्थिव रांची, छत्तीसगड येथून घेऊन त्यांच्या पत्नी व चिरंजीव निघाले असून, आज (५ नोव्हेंबर) नाचणे येथील त्यांच्या निवासस्थानातून त्यांची अंत्ययात्रा निघेल असे सांगण्यात आले.




