
राजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट.. अनेक ठिकाणी कापलेली भातपिके शेतातच पडून त्यातच रानडुकरांचा उपद्रव
राजापूरतालुक्यातील शेतकरी यावर्षी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. भातपीक कापणीला सज्ज असतानाच परतीच्या पावसाने शेतात साचलेल्या पाण्याने उभ्या आणि आडव्या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.हे नुकसान कमी की काय? म्हणून त्यातच जंगली प्राण्यांचा, विशेषतः रानडुकरांचा प्रचंड उपद्रव सुरू असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी अधिकच वाढली असून तो दुहेरी संकटात सापडला आहे.पावसाच्या सरींमुळे भात भिजून दाण्याचा दर्जा घसरत असून भाताचे गवतही भिजले असल्याने ते कुजून जाण्याची शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापणी सुरू केली असतानाच पाऊस आला, परिणामी अनेक ठिकाणी भातपिके शेतातच पडून राहिली आहेत. डोंगरपायथ्याच्या आणि खोऱ्यातील शेतांमध्ये तर पाणी साचून पीक पूर्णपणे नष्ट झाल्याचे दृश्य दिसत आहे. त्यात रात्रीच्या वेळी जंगलीडुकरांचे कळप शेतात घुसून उरलेसुरले पीक नष्ट करत असल्याने शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. शेतात पहारा देऊन थकलेले शेतकरी आता प्रशासनाकडे मदतीची आणि उपाययोजनेची मागणी करत आहेत. संपूर्ण हंगामभर कष्ट करून पीक आले, पण आता पाऊस आणि डुकरांच्या त्रासामुळे सर्व परिश्रम वाया गेले, अशी हताश प्रतिक्रिया स्थानिक शेतकऱ्यांनीव्यक्त केली. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करुन तातडीने मदत मिळावी, तसेच डुक्करांच्या वाढत्या उपद्रवावर वनविभागाने नियंत्रण आणावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.




