महसूल आणि जिल्हा परिषद प्रशासनाचा पुढाकार: कुर्दे, चांदोर, भगवतीनगर आणि चवे येथे एकाच दिवसात ४ वनराई बंधारे पूर्ण; विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचे उत्स्फूर्त श्रमदान


रत्नागिरी, १६ ): जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी जिल्हा परिषद आणि महसूल प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. पालकमंत्री डाॕ उदय सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद व महसूल प्रशासनामार्फत तालुक्यातील कुर्दे, चांदोर, भगवतीनगर आणि चवे या चार ठिकाणी एकाच दिवसात चार वनराई बंधारे यशस्वीरीत्या बांधण्यात आले.
प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेअंतर्गत कुर्दे गावातील वनराई बंधाऱ्याचे काम लोकसहभागातून पूर्ण झाले. कुर्दे येथील बंधारा बांधणीसाठी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबतच गावातील ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शालेय विद्यार्थ्यांनी एकत्र येत मोठे श्रमदान केले. ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या उद्देशाने लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेत हा बंधारा अल्पावधीत पूर्ण केला.
याबाबत माहिती देताना तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितले, “प्रशासनाच्या पुढाकाराला ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी मोलाची साथ दिली आहे. कुर्दे, चांदोर, भगवतीनगर आणि चवे येथे बांधण्यात आलेल्या या चारही बंधाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी अडवले जात आहे. पुढील काही महिन्यांत ग्रामस्थांसह गुराढोरांच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मोठी मदत होईल. दुष्काळसदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी हे वनराई बंधारे अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.”
स्थानिक लोकप्रतिनिधी प्रशासनाची ही तत्परता आणि श्रमदानात उतरलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा उत्साह यांचे संपूर्ण परिसरात विशेष कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button