
कोकण रेल्वेची भरारी ! १९९ कोटींचा नफा; २० हजार कोटींची नवी कामे!
कोकण रेल्वे महामंडळाने (केआरसीएल) आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये १९९.६३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला आहे. गेल्या अडीच वर्षांत २०,०५९ कोटी रुपयांची नवीन कामे मिळाली असून, २३,५५२ कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. महामंडळाचा ३७ वा स्थापना दिन गुरुवारी वाशी येथील सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्रात साजरा करण्यात आला.
महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी आर्थिक कामगिरी, मालवाहतूक व प्रवासी सेवांचा आढावा घेतला. यावेळी संचालक सुनील गुप्ता, राजीव कुमार मिश्रा, मुख्य दक्षता अधिकारी अविनाश तारहवाडकर आणि महिला सांस्कृतिक व सामाजिक सेवा संघटनेच्या अध्यक्षा मनीषा झा उपस्थित होत्या.
प्रवासी सुविधांसाठी तब्बल १०५ कोटी
२०२६-२७ मध्ये प्रवासी सुविधांसाठी २०.७७ कोटींची तरतूद असून, पुढील पाच वर्षांत १०५ कोटी खर्च करण्याचे नियोजन आहे. पादचारी पुलांचे संरचनात्मक परीक्षण करून २१ पुलांची दुरुस्ती करण्यात आली. एप्रिल ते सप्टेंबर २०२६ दरम्यान २४५ उन्हाळी विशेष, ३७९ गणपती विशेष आणि पाच विशेष गाड्या चालविण्यात आल्या.
मालवाहतूक अन् प्रकल्प
तिकीट तपासणीतून १५.०४ कोटींचे उत्पन्न मिळाले असून, विशेष मोहिमांतून ६.२३ कोटी रुपये वसूल झाले. काँगो प्रजासत्ताकात मेट्रो बांधकाम सुरू करण्याची तयारी असून, श्रीलंकेतील पूल बांधकाम व पुनर्वसन प्रकल्पांच्या निविदेतही महामंडळ सहभागी आहे.




