
कर्करोगाच्या महागड्या तपासण्यांचा आर्थिक भार कमी होणार; महात्मा फुले, आयुष्मान भारत योजनेत पेट-सीटीचा समावेश
महागड्या पेट-सीटी (PET-CT) तपासणीमुळे कर्करोगाचे निदान आणि उपचार रखडण्याची वेळ आता टळणार आहे. कर्करोगाचे अचूक निदान आणि वेळेत उपचार शक्य व्हावेत, यासाठी राज्य सरकारने ही तपासणी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.याबरोबरच कर्करोगावरील ६३ उपचार योजनांमध्ये अतिरिक्त निदान प्रक्रिया, तर १३ प्रकारच्या कर्करोगांसाठी स्वतंत्र तपासणीची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे कॅन्सर रुग्णांवरील उपचाराच आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. पेट-सीटी तपासणीचा खर्च परवडत नसल्याने अनेक रुग्ण ही तपासणी पुढे ढकलतात किंवा टाळतात. त्यामुळे आजाराचे अचूक स्वरूप समजणे आणि योग्य उपचार वेळेत सुरू करणे यामध्ये अडथळे निर्माण होतात. ही बाब लक्षात घेऊन नागरिक आणि संबंधित रुग्णालयांकडून या तपासणीचा आरोग्य योजनांमध्ये समावेश करण्याची मागणी होत होती. त्यानुसार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेनुसार स्वतंत्र अभ्यास समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशींचा विचार करून सरकारने हा निर्णय घेतला आहे.




