गौरी व ७ दिवसांच्या गणपती विसर्जनानिमित्त मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना १९ व २० सप्टेंबरला बंदी; शासनाचे शुध्दीपत्रक जारी


*रत्नागिरी, दि. १० : सन २०२६ च्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर गौरी आणि सात दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान अवजड वाहनांच्या वाहतुकीवर घालण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये राज्य शासनाने सुधारणा केली असून याबाबतचे अधिकृत शुध्दीपत्रक परिवहन विभागाने जारी केले आहे. सुधारित आदेशानुसार, गौरी व सात दिवसांच्या गणपती विसर्जन आणि कोकणवासियांच्या काही अंशी परतीच्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर, दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री २३ वाजेपर्यंत सलग मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वजन क्षमता असणाऱ्या सर्व जड व अवजड वाहनांची (उदा. ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर, लॉरी इत्यादी) वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.
यापूर्वी ७ सप्टेंबर २०२६ च्या मूळ आदेशात १९ सप्टेंबर रोजी रात्री २३ वाजता बंदीचा कालावधी संपण्याबाबतचा उल्लेख होता. मात्र, त्यात सुधारणा करून आता १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून २० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत अखंडितपणे ही वाहतूक बंदी लागू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुकर व्हावा तसेच स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेऊन नवी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि संबंधित जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक यांना या वाहतूक निर्बंधांमध्ये आवश्यकतेनुसार शिथिलता आणण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच जे.एन.पी.टी. आणि जयगड बंदरातून होणारी आयात-निर्यातीची वाहतूक सुरळीत राहण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याचे निर्देशही शासनाचे उपसचिव चेतन निकम यांनी निर्गमित केलेल्या आदेशात दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button