पहाटे घरात घुसला बिबट्या; ६० वर्षीय महिलेने अर्धा तास दिली झुंज


कोंबड्यांच्या शिकारीसाठी आलेल्या बिबट्याचा महिलेवर हल्ला; प्रसंगावधान राखत घराबाहेर काढले


संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे सुवारेवाडी येथे शुक्रवारी पहाटे बिबट्याने थेट घरात घुसून ६० वर्षीय महिलेवर हल्ला केल्याची थरारक घटना घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रतिभा प्रकाश दळवी (वय ६०) यांच्या घरात कोंबड्यांची शिकार करण्यासाठी बिबट्या शिरला. घरातील कोंबड्यांवर ताव मारल्यानंतर बिबट्याने प्रतिभा दळवी यांच्यावरही हल्ला केला.

अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरून न जाता प्रतिभा दळवी यांनी धैर्याने बिबट्याचा प्रतिकार केला. तब्बल अर्ध्या तासाहून अधिक काळ त्यांचा बिबट्याशी संघर्ष सुरू होता. अखेर प्रसंगावधान राखत त्यांनी घराचा पुढील दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच बिबट्याने घरातून बाहेर पडत जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.

बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रतिभा दळवी यांना ग्रामस्थांनी तातडीने देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान, करंबेळे-शेवरवाडीनंतर आता वांझोळे परिसरातही बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करून ग्रामस्थांना सुरक्षितता मिळवून द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button