स्मारकाच्या कामाचा आढावा आणि नियोजित आराखड्याची पाहणीकसबा भूमीत छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक: सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

रत्नागिरी, दि. 15 ):- ‘ही भूमी पावन आणि ऐतिहासिक आहे. प्रेरणा आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या या कसबा भूमीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हावे, ही स्थानिक नागरिकांची अनेक वर्षांची इच्छा आहे. या स्मारकाच्या कामाची सुरुवात, निधी आणि इतर आवश्यक व्यवस्था आता अंतिम टप्प्यात असून, लवकरच हे भव्य स्मारक साकारले जाईल,’ अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दीमत्ता आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज येथे दिली.
कसबा (संगमेश्वर) येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी आणि नियोजित आराखड्याची पाहणी करण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन, महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन अभिवादन केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
यावेळी आमदार प्रमोद जठार, आमदार किरण सामंत, प्रशांत यादव, वैभव खेडेकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार म्हणाले, ‘या स्मारकाच्या संदर्भात आमदार प्रमोद जठार यांनी माझ्या विभागात महत्त्वाची बैठक घडवून आणली होती. तसेच, राज्याचे कॅबिनेट आणि रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनीही विधिमंडळात या स्मारकाबाबत सकारात्मक घोषणा केली होती. त्यानुसार आता स्मारकाचा निधी आणि प्रशासकीय सोपस्कार पूर्ण होत असून, कामाची प्रत्यक्ष पाहणी व आढावा घेण्यासाठीच मी आज या पवित्र भूमीत आलो आहे.’
यानंतर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांनी सादरीकरण करुन स्मारकाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार यांनी प्रत्यक्ष स्मारकस्थळी भेट देत वाड्याची परिसरातील मंदिराची पाहणी करुन अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button