
सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांच्या तक्रारीची दखल, आमदार अशोक पाटील यांच्या हर्णेतील बांधकामावर होणार कारवाई
दापोली तालुक्यातील हर्णे येथील कथित सीआरझेड उल्लंघन प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले असून सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांनी केलेल्या तक्रारीची शासनाने गंभीर दखल घेतली. सरकारने त्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अशोक पाटील हे शिंदे शिवसेनेचे भांडुप येथील आमदार असल्याने या प्रकरणामुळे हर्णे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
हर्णे येथील सर्वे क्रमांक १८, दुसरा नंबर ११ या जागेचे जमीन मालक अशोक पाटील यांनी केलेल्या बांधकामाबाबत प्रसाद कर्वे यांनी ’आपले सरकार’ पोर्टलवर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत संबंधित बांधकाम सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच विनाशेती परवानगी रद्द झाल्यानंतरही बांधकाम सुरू असल्याचे नमूद करण्यात आले होते.
कर्वे यांनी दाखल केलेल्या अर्जाची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने चौकशी प्रक्रिया सुरू करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी काढलेल्या अधिकृत पत्रानुसार, हर्णे येथील संबंधित जागेची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून बांधकामाची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासनाच्या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, जर पाटील यांनी केलेले बांधकाम सीआरझेड क्षेत्रामध्ये येत असेल आणि सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून विनापरवाना उभारण्यात आले असल्याचे निष्पन्न झाले, तर त्या अनधिकृत बांधकामावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी. यामध्ये सर्वोच्च न्यायालयातील सिव्हिल अपील क्रमांक १४६०४/२०२४ व १४६०५/२०२४ मधील आदेशांचा तसेच सीआरझेड अधिसूचना २०११ मधील तरतुदींचा आधार घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
www.konkantoday.com



