राजापूर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत; टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर भर

पाणीपुरवठा, आरोग्य व बांधकाम विभागाला २४ तास अलर्टचे आदेश

राजापूर : वाढत्या उष्णतेमुळे राजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली व शिळ या दोन्ही प्रमुख जलस्रोतांतील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. त्यातच कोदवली येथील नवीन पर्यायी धरणाचे काम सुरू असताना मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. शिळ येथून होणाऱ्या पाणीपुरवठ्यातही वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे अडथळे निर्माण होत असल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
या पार्श्वभूमीवर शहरवासीयांना निश्चित दिवशी सुरळीत पाणीपुरवठा करता यावा यासाठी टँकरच्या माध्यमातून साठवण टाक्यांमध्ये पाणी भरून वितरण करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा अॅड. हुस्नबानू खलिफे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
त्या म्हणाल्या की, नवीन पर्यायी धरणाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या पावसाळ्यात त्यात पाणीसाठा करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी शहरावरील पाणीटंचाईचे संकट मोठ्या प्रमाणात दूर होईल. मात्र यावर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करून नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
रविवारी कोदवली धरणाकडून येणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला होता. नगराध्यक्षा अॅड. खलिफे, उपनगराध्यक्ष विनय गुरव व पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे यांनी घटनास्थळी जाऊन रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम करून जलवाहिनी पूर्ववत सुरू केली. मात्र कोदवली धरणातील घटता साठा आणि शिळ येथील विजपुरवठ्यातील अडथळे यामुळे एक दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यातही व्यत्यय येत असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या नगर परिषदेकडून अग्निशामक बंबाच्या टँकरद्वारे दररोज सुमारे दोन लाख लिटर पाणी साठवण टाक्यांमध्ये भरले जात आहे. याशिवाय प्रत्येकी दहा हजार लिटर क्षमतेचे आणखी दोन टँकर अधिग्रहित करून पाणीपुरवठा अधिक सुरळीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोदवली धरण परिसरात ‘गाळ नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून गाळ काढण्याचे कामही सुरू असून त्यामुळे भविष्यात पाणीसाठा वाढण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पाणीटंचाई व तोंडावर आलेला पावसाळा लक्षात घेऊन पाणीपुरवठा, आरोग्य व बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना २४ तास सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित विभागांच्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या असून कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही अॅड. खलिफे यांनी दिला.
पावसाळापूर्व कामांना वेग
शहरातील नाले व गटार सफाई, झाडांची छाटणी, स्वच्छता आदी पावसाळापूर्व कामांना प्राधान्याने सुरुवात करण्यात आली आहे. पावसाळ्यात नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात असून आपत्कालीन परिस्थितीसाठी नगर परिषद प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात आले. तसेच नगर परिषदेकडून छोट्या ट्रॅक्टरवरील जेसीबीचीही व्यवस्था करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
या पत्रकार परिषदेला पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे, बांधकाम सभापती सुबोध पवार, कार्यालय अधीक्षक जितेंद्र जाधव आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button