
चिपळूण खेर्डी एमआयडीसीच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला ब्रेक
काही दिवसांपूर्वी चिपळूण तालुक्यातील खेर्डी एमआयडीसी परिसरात पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता प्रशासनाचे लक्ष लोटे व इतर एमआयडीसी क्षेत्रांकडे वळले आहे. लोटे एमआयडीसी हद्दीत सुमारे १७० जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये गोशाळा, टपरीचालक, लहान-मोठी दुकाने तसेच काही पक्क्या बांधकामांचाही समावेश असल्याचे समजते. संबंधितांना मुदत देऊन अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र प्रत्यक्ष हटाव मोहिमेसाठी आवश्यक असलेला पोलीस बंदोबस्त अद्याप न मिळाल्याने कारवाई रखडलेली आहे.
दरम्यान, गाणे-खडपोली २३ एमआयडीसी परिसरात अनधिकृत अतिक्रमणांची नोंद करण्यात आली आहे. येथे काही पक्की बांधकामे असून त्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र संबंधितांनी या कारवाईवर आक्षेप घेत, ही बांधकामे एमआयडीसीच्या अखत्यारित नसून ती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतात, असा दावा केला आहे या वादाच्या पार्श्वभूमीवर संबंधित क्षेत्राचे पुनर्सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
www.konkantoday.com




