९५ दिवसांत १४ मजली इमारत; ‘पीएमआरडीए’चा विक्रम!

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) चिखली येथील ‘सेक्टर १२’ गृहनिर्माण प्रकल्पात अवघ्या ९५ दिवसांत १४ मजली इमारत उभारण्याचा विक्रम केला आहे. त्याची ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ‘पीएमआरडीए’ने यापूर्वीचा आपलाच १०० दिवसांचा जुना विक्रम मोडीत काढून बांधकामाचा नवा मापदंड प्रस्थापित केला.

या संदर्भात ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’चे परीक्षक अशोक अदाक यांनी अधिकृत प्रमाणपत्र आणि पदक देऊन ‘पीएमआरडीए’चा गौरव केला. प्राधिकरणाच्यावतीने मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी हा बहुमान स्वीकारला. या विक्रमासाठी ‘बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी’ या कंपनीच्या सुमारे ९ हजार कामगारांनी तीन शिफ्टमध्ये अहोरात्र काम केले.

अत्याधुनिक ‘प्रीकास्ट आरसीसी’ तंत्रज्ञानामुळे गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता ही इमारत विक्रमी वेळेत पूर्ण झाली. ही वास्तू पूर्णपणे भूकंपप्रतिरोधक असून, शाश्वत नागरी विकासाचे उत्तम उदाहरण ठरली आहे, असे ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त अभिजीत चौधरी यांनी सांगितले. यापूर्वी मार्च २०२६ मध्ये ‘पीएमआरडीए’ने १०० दिवसांत इमारत बांधून विक्रम केला होता. मात्र, अवघ्या एका महिन्यात पुन्हा स्वतःचेच रेकॉर्ड सुधारत ९५ दिवसांत हा विक्रम केला आहे.

दरम्यान, पीएमआरडीएच्या सेक्टर-१२ येथील गृहनिर्माण प्रकल्पात ‘मिशन ९५ डेज’ हे मोठे आव्हान स्वीकारले होते. या प्रकल्पात फॅक्टरी-मेड प्रीकास्ट घटकांचा वापर केल्यामुळे बांधकामाचा वेग वाढला, तसेच गुणवत्तेतही कमालीची समानता राखली गेली आणि साहित्याची नासाडी कमी झाल्याचे मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button