सिंधुदुर्ग जिल्ह्यात करूळ घाटात सिमेंटचा ट्रक ३०० फूट खोल दरीत कोसळला;चालक आणि क्लीनर असलेल्या बाप-लेकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू!


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील करूळ घाटात गुरुवारी पहाटे सिमेंटने भरलेला ट्रक सुमारे ३०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या हृदयद्रावक घटनेत ट्रक चालक आणि क्लीनर असलेल्या पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रक दरीत कोसळल्याने त्याचा पूर्णतः चक्काचूर झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजू प्रेमसिंग राजपूत (वय ५९) हे आपल्या मालकीच्या ट्रकमध्ये कर्नाटक मधील गुलबर्गा येथून सिमेंट भरून वैभववाडी-कोकिसरेच्या दिशेने येत होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा राहुल राजू राजपूत (वय २०, रा. कोचलगी तांडा, जि. विजापूर) हा क्लीनर म्हणून होता. पहाटे ४:४५ च्या सुमारास त्यांनी गगनबावडा येथे थांबून चहा घेतला आणि पुढचा प्रवास सुरू केला.

मात्र, करूळ घाट उतरत असताना दिंडवणे नजीक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक सुरक्षा कठडे तोडून थेट ३०० फूट खोल दरीत कोसळला. अपघाताची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दरी अत्यंत खोल आणि दुर्गम असल्याने ‘सह्याद्री जीवरक्षक’ टीमला पाचारण करण्यात आले.

हेमंत पाटील, प्रदीप मोरे, राजेंद्र वारंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या शिताफीने दरीत उतरून बचावकार्य राबवले. मात्र, दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. स्थानिक ग्रामस्थ आणि भैरी भवानी कंपनीचे मालक गिरीधर रावराणे यांनीही या कार्यात मोलाचे सहकार्य केले. करूळ घाटातील रस्ता सिमेंट काँक्रीटचा झाल्यापासून गेल्या १५ दिवसांत तीन ते चार अपघात झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button