
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, हायवेवर बस उलटली; 38 जखमी, 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. नागोठणे जवळील सुकळी खिंडीत शुक्रवारी पहाटे एका खाजगी बसला भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.या अपघातात ३८ प्रवासी जखमी झाले असून त्यातील १० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. विशेष म्हणजे, हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे नसून चालकाच्या बेजबाबदारपणामुळे झाल्याचा खळबळजनक आरोप प्रवाशांनी केला आहे.
मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी ही खाजगी लक्झरी बस सुकळी खिंडीतून जात असताना पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. खिंडीतील तीव्र वळणावर चालकाचा वेगावरचा ताबा सुटला आणि बस थेट उलटली. बस उलटताच प्रवाशांमध्ये एकच आक्रोश आणि गोंधळ निर्माण झाला. अपघाताचा आवाज इतका मोठा होता की स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली.
या अपघातातून बचावलेल्या प्रवाशांनी चालकाच्या वर्तणुकीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, प्रवास सुरू झाल्यापासूनच चालक अतिशय वेगाने आणि नागमोडी पद्धतीने बस चालवत होता. अनेक प्रवाशांनी त्याला टोकले, तरीही त्याने दुर्लक्ष केले. धक्कादायक बाब म्हणजे, काही प्रवाशांनी बस धावत असतानाच RedBus या पोर्टलवर चालकाच्या बेदरकार ड्रायव्हिंगबाबत ऑनलाईन तक्रारही नोंदवली होती. दुर्दैवाने, या तक्रारीची दखल घेण्यापूर्वीच हा भीषण अपघात घडला.
या अपघातानंतर नागोठणे पोलीस आणि स्थानिक रेस्क्यू टीमने जखमींना बसमधून बाहेर काढले. जखमींना सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, मात्र गंभीर जखमी असलेल्या ९ ते १० प्रवाशांना तातडीने कळंबोली येथील एमजीएम (MGM) रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघातात मृत पावलेले दोन प्रवासी नेमके कुठले आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.




