तळे बंदरवाडी देवघर रस्त्याची दुर्दशा; खड्डे भरण्यासाठी मागणी

खेड : तालुक्यातील तळे बंदरवाडी देवघर रस्त्याची अल्पावधीतच दुर्दशा झाली असून वाहनचालकांना जीव धोक्यात घालून गाड्या चालवाव्या लागत आहेत, अशी माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र बाबू आखाडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
देवघर बंदरवाडीजवळील वळणावर दोन्ही बाजूंनी रस्ता खराब झाला असून या ठिकाणावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मागील अनेक दिवसांपासून हा रस्ता खराब झाला असून, तळे भागातील राजकीय पुढाऱ्यांना या खड्ड्यांकडे पाहण्यास वेळ नाही आहे. मागील जिल्हा परिषद निवडणूक काळात अनेक मान्यवर पुढाऱ्यांच्या गाड्या तळे बंदरवाडी देवघर रस्त्यावरून धावत होत्या; परंतु या खड्ड्याकडे त्यांचे लक्ष गेले नसल्याचे दिसून येत आहे.
तळे बंदरवाडी देवघर रस्त्याला कोण वाली आहे का नाही, असा संतप्त सवाल आता परिसरातील जनतेतून केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व देवघर ग्रुप ग्रामपंचायतीने तातडीने दखल घेऊन तळे बंदरवाडी देवघर रस्त्यावरील खड्डे भरण्याची व्यवस्था करावी, अशी तळे भागातील जनतेची मागणी असल्याचे श्री. आखाडे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button