
कोकणच्या निसर्गसंपन्न किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येणाऱ्या दुर्मिळ ‘ऑलिव्ह रिडले’ समुद्री कासवांच्या संरक्षणासाठी दापोली प्रशासनाचे कडक निर्बंध!
- कोकणच्या निसर्गसंपन्न किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येणाऱ्या दुर्मिळ ‘ऑलिव्ह रिडले’ समुद्री कासवांच्या संरक्षणासाठी दापोली प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. कासवांच्या प्रजनन कालावधीत त्यांच्या नैसर्गिक प्रक्रियेला कोणताही अडथळा येऊ नये यासाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी विशेष आदेश जारी करून किनाऱ्यांवर विविध निर्बंध लागू केले आहेत. पर्यावरण संवर्धनाबरोबरच निसर्ग पर्यटनाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने ही उपाययोजना महत्त्वाची मानली जात आहे.
दक्षिण कोकण वनविभागाच्या सूचनेनुसार दापोली तालुक्याला लाभलेल्या दाभोळपासून ते केळशीपर्यंतच्या किनाऱ्यांवर ‘ऑलिव्ह रिडले’ कासव मोठ्या प्रमाणात अंडी घालण्यासाठी येतात. या प्रक्रियेदरम्यान कासवांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने मानक कार्यपद्धती निश्चित केली आहे.
प्रजनन कालावधीत किनाऱ्यांवर रात्रीच्या वेळी प्रखर दिव्यांचा वापर टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, ध्वनी प्रदूषण होईल असे मोठ्या आवाजात संगीत किंवा अन्य कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
किनाऱ्यावर प्लास्टिक किंवा कोणताही कचरा टाकण्यास सक्त मनाई करण्यात आली असून पर्यटकांनी स्वच्छतेचे नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या संवेदनशील भागांमध्ये कासव अंडी घालतात, त्या ठिकाणी वाहनांच्या वर्दळीवरही बंदी लागू करण्यात आली आहे.
कासव दिसल्यास त्यांना स्पर्श करणे, फ्लॅश लाईट मारणे किंवा त्यांच्या नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा आणणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा ठरेल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. कासव संवर्धन ही केवळ पर्यावरण रक्षणाची बाब नसून निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाची असल्याने नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकाऱ्यांनी केले आहे.




