
रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा
अशोक खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात निर्माण केलेल्या वादळाचा फटका अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीपर्यंत पोहोचला आहे. आधीच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन बचावात्मक भूमिका घेतलेल्या रुपाली चाकणकर यांनी आता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा देत राजकीय दडपणाला प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट झाले आहे.खरात प्रकरण समोर आल्यानंतर केवळ कायदेशीरच नव्हे, तर नैतिक जबाबदारीचा मुद्दा पुढे येत होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही फोटो आणि व्हिडिओंमध्ये चाकणकर या अशोक खरातच्या पाद्यपूजेत सहभागी असल्याचे दिसल्याने विरोधकांनी त्यांना थेट लक्ष्य केले. “महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या पदावर असलेली व्यक्ती अशा वादग्रस्त व्यक्तीशी जोडली जाते कशी?” असा सवाल सातत्याने उपस्थित केला जात होता. या पार्श्वभूमीवर त्यांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा हा पहिला टप्पा मानला गेला.
मात्र, त्यानंतरही राजकीय आणि सार्वजनिक दबाव कमी झाला नाही. उलट राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरही त्यांनी राहू नये, अशी मागणी अधिक तीव्र झाली. अखेर पक्ष नेतृत्वाशी चर्चा करून चाकणकर यांनी हा निर्णय घेतला. त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी झालेल्या संवादानंतर राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे, आपल्या भूमिकेबाबत चाकणकर अजूनही ठाम आहेत. खरातच्या कथित गैरकृत्यांशी किंवा आर्थिक व्यवहारांशी आपला कोणताही संबंध नसल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे. “तपास निष्पक्ष आणि पारदर्शक व्हावा,” अशी मागणी त्यांनी आधीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलिस महासंचालकांकडे केली असल्याचेही त्यांनी सांगितले. माध्यमांमधून पुराव्याशिवाय होणारे आरोप वेदनादायक असल्याची खंत व्यक्त करत, “सत्य बाहेर येईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




