मुरूड किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 46 अंडयाचे यशस्वी संवर्धन


दापोलीः- मुरूड समुद्रकिनाऱ्यावर दुर्मिळ ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवाच्या संवर्धनाबाबत आनंदाची बातमी समोर आली आहे. मुरूड किनाऱ्यावर या कासवांनी घातलेली तब्बल 46 अंडी सुरक्षितपणे संवर्धित करण्यात आली असून या उपक्रमामुळे पर्यावरणप्रेमी व स्थानिक ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मुरूड समुद्रकिनाऱ्यावर काही दिवसांपूर्वा ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाने अंडी घातल्याने स्थानिकांना आढळून आले. ही माहिती मिळताच स्थानिक कासव रक्षक, पर्यावरणप्रेमी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत अंडयांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना केल्या. अंडी सुरक्षित राहावीत यासाठी ती समुद्रकिनाऱ्यावरील योग्य ठिकाणी संरक्षित करून त्याभोवती संरक्षक जाळी लावण्यात आली आहे. समुद्रकिनाऱ्यावर नैसर्गिकरित्या घातलेली अंडी अनेकदा भरती-ओहोटी, पावसाचे पाणी तसेच भटक्या कुत्रे व इतर प्राण्यांमुळे नष्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा अंडयांचे योग्य प्रकारे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे असते. मुरूड येथेही याच पार्श्वभूमीवर ही अंडी सुरक्षित ठेवण्यात आली असून त्यावर नियमित देखरेख ठेवली जात आहे.
साधारणपणे 45 ते 50 दिवसांच्या कालावधीनंतर या अंडयांमधून कासवांची पिल्ले बाहेर पडतात. त्यानंतर ही पिल्ले पुन्हा समुद्रात सोडली जातात. त्यामुळे समुद्री पर्यावरणातील जैवविविधता टिकवून ठेवण्यास मोठी मदत होते. मुरूड येथे सुरू असलेला हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जात आहे.
या संवर्धन मोहिमेत मुरूड येथील कासव रक्षक राजेश शिगवण आणि दुर्गेश जाधव यांनी विशेष पुढकार घेतला असून स्थानिक ग्रामस्थांनीही त्यांना सहकार्य केले आहे. त्यांच्या सतर्कतेमुळे कासवांची अंडी सुरक्षित ठेवणे शक्य झाले आहे. कोकण किनारपट्टीवर दरवर्षा ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी आढळून येतात. मात्र त्यांचे योग्य संवर्धन झाल्यासच या दुर्मिळ समुद्री प्रजातीचे संरक्षण होऊ शकते. मुरूड गावात राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती वाढण्यास मदत होत असून या कार्याचे सर्व स्तरांतून कोतुक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button