
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन; मराठेशाहीचा जिज्ञासू इतिहासकार हरपला!
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे गुरुवारी येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. मराठेशाहीचा विशेषतः राजर्षी छत्रपती शाहू महाराज, करवीर संस्थापिका ताराराणी यांच्या विषयी त्यांनी मोलाचे संशोधन करणारे जिज्ञासू इतिहासकार हरपला अशा भावना व्यक्त होत राहिल्या.
गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती बिघडलेली प्रकृती बिघडली होती त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला हडसर (जिल्हा सांगली ) येथे ३० डिसेंबर १९४१ रोजी जयसिंगराव पवार यांचा जन्म झाला. शिवाजी विद्यापीठात त्यांच्या शैक्षणिक संशोधन कार्याचा पाया रचला गेला. एम.ए. मध्ये सर्वप्रथम आलेले पवार यांनी येथेच आणि पीएच.डी. पदवी संपादन केली. तीन दशकांहून अधिक काळ महाविद्यालयीन क्षेत्रात प्राध्यापक म्हणून काम केले. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगराव पवार यांच्या संशोधन कारकिर्दीची मुहूर्तमेढ १९६४ मध्ये रोवली गेली.
शाहूमय जीवन
डॉ. जयसिंगराव पवार हे मराठ्याची इतिहासाचे बिनीचे संशोधक होते. विशेषतः राजर्षी छत्रपती शाहू महाराज, करवीर संस्थापिका ताराराणी यांच्या विषयी त्यांनी मोलाचे संशोधन केले. त्याविषयी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांचा इतिहास नव्या पिढीसाठी यावा यासाठी ते सातत्याने व्याख्याने, शिबिरांना उपस्थिती लावत असत. त्यांच्या ओघवत्या शैलीतील शाहू चरित्र,, ताराराणींचे चरित्र ऐकणे ही अभ्यासकांसाठी मोठी संधी असे.
लोकसत्ताचे पुस्तक प्रकाशन
छत्रपती शाहू महाराजांच्या लोकोत्तर कार्याचा समग्र आढावा घेणारा ‘ लोकसत्ताचा ‘राजर्षी’ विशेषांक’ हा गतवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये डॉ. जयसिंगराव पवार व डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते कोल्हापुरात प्रकाशित झाला होता. आपल्या विवेचनामध्ये डॉ. पवार यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या व्यक्तीमत्त्वाचे विविध पैलू उलगडून सांगितले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे कर्ते सुधारक होते. त्यांनी घडवून आणलेली सामाजिक क्रांती ही त्यांची उत्स्फूर्त अंतःप्रेरणा होती. इतिहास समजून घेण्यासाठी शे-दोनशे वर्षे मागे जाऊन त्याचा वेध घ्यावा लागतो. धर्म, शिक्षण, व्यवसाय, नोकरी या सर्व बाबतीत ब्राह्मणशाहीची मक्तेदारी असण्याच्या काळात शाहू महाराजांनी राज्यकारभार स्वीकारला.तत्कालीन परिस्थिती पाहून महाराजांनी आरक्षणाचे धोरण जाहीर केले, अशी भूमिका डॉक्टर पवार यांनी यावेळी मांडली होती.
कोल्हापूरचा इतिहास
डॉ. जयसिंगराव पवार यांच्या ‘ऐतिहासिक व प्राकृतिक’ या खंडामध्ये कोल्हापूरच्या सुमारे २५०० वर्षांच्या इतिहासावर प्रकाश टाकण्यात आला आहे. विविध विषयतज्ज्ञांनी १७ लेखांच्या माध्यमातून कोल्हापूरच्या प्राचीन व मध्ययुगीन इतिहासासह प्राकृतिक इतिहासाचाही वेध घेतला आहे. यामध्ये ब्रह्मपुरी, करवीर नावाची व्युत्पत्ती, कोल्हापूरचे कोट, जिल्ह्यातील किल्ले, शिवकाळ, महाराणी ताराबाई, करवीरकर महाराणी जिजाबाई, १८५७ चा स्वातंत्र्यलढा आणि चिमासाहेब महाराज, करवीर रियासत, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती घराण्यातील कुलाचार, संस्थानातील स्वातंत्र्यलढा, कोल्हापूर भूगोल, वनस्पतीसंपदा, प्राणिसंपदा आणि पक्षीसंपदा या विषयांवरील लेखांचा समावेश सदर खंडात आहे. डॉ. जयसिंगराव पवार यांनी कोल्हापूरच्या इतिहास ग्रंथाच्या रुपाने महाराष्ट्रासाठी एक पथदर्शक स्वरुपाचा प्रकल्प सादर केला आहे. त्याचे सर्वत्र अनुकरण होणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनी या पुस्तक प्रकाशन समयी व्यक्त केले होते.
अनेक भाषांमध्ये पुस्तक
शाहू चरित्रकार डॉ. जयसिंगराव पवार यांच्या ‘राजर्षी शाहू छत्रपती : एक समाज क्रांतिकारी राजा’ या चरित्र ग्रंथाचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. मराठी, रशियन, इटालियन,इंग्रजी, जर्मन तसेच कन्नड, कोंकणी, तेलगू, उर्दू, हिंदी या भाषेत शाहू चरित्र ग्रंथ प्रसिद्ध आला आहे. गुजराती. बंगाली व सिंधी भाषेतील चरित्र प्रकाशनाच्या वाटेवर आहे. १५ भारतीय व १० विदेशी अशा २५ भाषा अनुवाद प्रकल्पाचे हे काम आहे.




