
अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांचे निलंबन मागे; दिलगिरीनंतर राज्य सरकारचा निर्णय
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव आणि २०११ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांचे निलंबन अखेर मागे घेण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्याने या प्रकरणावर लेखी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर, विधानसभा अध्यक्षांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने विधानसभेत दिली.
चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या प्रदूषणाच्या समस्येवर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा झाली होती. या विषयावर आयोजित बैठकांना वरिष्ठ अधिकारी वारंवार अनुपस्थित राहत असल्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते.विशेषतः एम. देवेंद्र सिंग हे आदेश देऊनही बैठकीला हजर न राहिल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई म्हणून निलंबनाचे आदेश देण्यात आले होते.
निलंबनाच्या कारवाईनंतर एम. देवेंद्र सिंग यांनी प्रशासनाकडे आपली बाजू मांडली आणि आवश्यक कागदपत्रे सादर करत या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली.या संदर्भात खालील घडामोडी घडल्या.त्यामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणाबाबत सभागृहात अधिकृत निवेदन दिले.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संबंधित अधिकाऱ्याने दिलगिरी व्यक्त केल्याने त्यांचे निलंबन रद्द करण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अध्यक्षांच्या सूचनेनुसार हे निलंबन मागे घेणार असल्याचे स्पष्ट केले.
बैठकांना गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती.आता हे आदेश मागे घेण्यात आले असून, त्यांना पुन्हा दिलासा मिळाला आहे.




