डेरवण कॅन्सर डिटेक्शन सेंटरला रेफरिंग सेंटरची मान्यता द्या

आ. शेखर निकम यांची कोकणाच्या आरोग्यासाठी ठोस मागणी


अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५-२६ दरम्यान चिपळूण–संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी कोकणातील आरोग्य सुविधांबाबत अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत ग्रामीण रुग्णांसाठी सक्षम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली.

डेरवण येथील बी. के. एल. वालावलकर हॉस्पिटल निदान व संशोधन केंद्रामार्फत चालवण्यात येणाऱ्या अत्याधुनिक कॅन्सर डिटेक्शन सेंटरला शासनाचे अधिकृत रेफरिंग सेंटर म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी ठोस मागणी आमदार शेखर निकम यांनी सभागृहात मांडली. या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर आणि सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध असून, शासनाकडून अधिकृत मान्यता मिळाल्यास कोकणातील ग्रामीण भागातील हजारो रुग्णांना वेळेवर तपासणी व उपचाराचा मोठा लाभ होणार आहे.

कॅन्सरसारख्या गंभीर आजारात लवकर निदान अत्यंत महत्त्वाचे असल्याने डेरवण येथील कॅन्सर डिटेक्शन सेंटरला अधिकृत मान्यता मिळणे कोकणवासीयांसाठी दिलासादायक ठरणार असल्याचे आमदार निकम यांनी या वेळी नमूद केले.

यासोबतच, यापूर्वी जिल्ह्याला देण्यात आलेल्या कॅन्सर तपासणी वॅन सध्या कार्यरत नसल्याकडे लक्ष वेधत त्या तातडीने उपलब्ध करून द्याव्यात तसेच राज्यभर कॅन्सर तपासणी वॅनची संख्या वाढवावी, अशी आग्रही मागणीही आमदार शेखर निकम यांनी केली.

या मुद्द्यावर आरोग्यमंत्री श्री. प्रकाश आंबीटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. राज्यात कॅन्सर तपासणी वॅनची संख्या अपुरी असल्याचे मान्य करत, त्या वाढवण्याबाबत सविस्तर विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

कोकणातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने आमदार शेखर निकम यांच्या या प्रयत्नांना महत्त्व प्राप्त झाले असून, भविष्यात ग्रामीण रुग्णांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button