
चिपळूण शहरातील नागरिकांना जुन्या दरानेच आकारणार घरपट्टी
चिपळूण शहरातील नागरिकांना करवाढीचा तितकासा चटका न देता नगर परिषदेचा २०२६-२०२७ सालचा १६४ कोटीचा अर्थसंकल्प राहणार आहे. यावर बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. गेल्या काही वर्षापासून गाजत असलेला घरपट्टीच्या विषयावर चर्चा करताना जुन्या दरानेच घरपट्टी आकारणीचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मात्र पाणी विभागासाठी नाममात्र करवाढ करण्यात येणार आहे. तसेच नगर परिषदेला १५० वर्षे पूर्ण होत असल्याने यानिमित्ताने शहरात विविध कार्यक्रम घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
नगर परिषदेची निवडणूक झाल्यानंतर बुधवारी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या उपस्थितीत स्थायी समितीची पहिलीच बैठक डिबीजे महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली. १६४ कोटीच्या अर्थसंकल्पावर चर्चा झाली. यातील १५६ कोटी खर्च, ८ कोटीचा शिलकी अर्थसंकल्प असणार आहे. हा अर्थसंकल्प आता मुख्य सभेपुढे ठेवला जाणार असून येथे मंजुरी मिळाल्यानंतर तो पुढील मंजुरीसाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्याकडे जाणार आहे. अर्थसंकल्पाचा विचार करता नळ कनेक्शन बंद करण्यासाठी २५० ऐवजी ३०० रुपये, नळ कनेक्शन दुरुस्तीसाठी ७५० ऐवजी ९०० रुपये, नळकनेक्शन जागा बदलण्यासाठी १००० ऐवजी ११०० रुपये, नळकनेक्शन नाव दुरुस्त करण्यासाठी यापूर्वी कोणतेही शुल्क घेतले जात नव्हते मात्र आता व्यापार्यांना २०० रुपये, घरगुती नळकनेक्शन धारकांना १५० रुपये कर द्यावा लागणार आहे. हा नाममात्र कर वाढवताना घरपट्टी मात्र जुन्या दरानेच आकारण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. नगर परिषदेला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे महिला, युवक, युवती यांच्यासह नागरीकांसाठी विविध कार्यक्रम, नगराध्यक्ष चषक स्पर्धा घेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.www.konkantoday.com




