
एसटीच्या ताफ्यातील शिवशाही बस बंद होणार; चालू ४५३ बसचे निमआराम बसमध्ये रूपांतर!
माजी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या शिवशाही बसेस आता बंद होणार आहेत. या वातानुकूलित बसमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने या बस बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सध्या कार्यरत असलेल्या ४५३ बसचे रूपांतर निमआराम आणि साध्या वाहनांमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
राज्यातील शिवशाही बसेस बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याबाबत श्रीकांत भारतीय यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. राज्यातील शिवशाही बसेस १० वर्षांपेक्षा जुन्या, कालबाह्य आणि तांत्रिकदृष्ट्या अयोग्य आहेत. मात्र तरीही सदर बसेस प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात येत असल्याची बाब भारतीय यांनी निदर्शनास आणली. या बसमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होणे, ब्रेक निकामी होणे, इंजिन तापणे, टायर फुटणे, दरवाजे योग्य वेळी न करणे आदी बिघाड घडत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावर दिलेल्या लेखी उत्तरात प्रताप सरनाईक यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात ६८८ स्वमालकीच्या शिवशाही बस आहेत.
जानेवारी २०२६ मध्ये सरासरी ४५३ शिवशाही बस कार्यरत आहेत. मात्र या बसमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने व प्रवासी प्रतिसाद कमी असल्याने या शिवशाही बस बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले. या शिवशाही बसचे रूपांतर निमआराम व साध्या वाहनांमध्ये रूपांतरण करण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. त्यावर कार्यवाही सुरू असून या बस १० वर्षांहून अधिक काळ वापरण्यात येणार नसल्याचे परिवहनमंत्र्यांनी स्पष्ट केले.
वर्षाकाठी ३४०० कोटी खर्च
सध्या एसटी महामंडळावर सुमारे १२ हजार कोटी रुपयांचा संचित तोटा आहे. वर्षाकाठी डिझेल खरेदीवर सुमारे ३,४०० कोटी रुपये खर्च होतात. लवकरच ८ हजार नव्या डिझेल बसेस ताफ्यात दाखल होणार असल्याने हा खर्च अंदाजे ४,७०० कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत डिझेल दरात केवळ १ रुपयांची घट झाली तरी वर्षाकाठी सुमारे ५० ते ५५ कोटी रुपयांची बचत होऊ शकते, असे सांगण्यात आले आहे.




