
अरबी समुद्रात येणार्या थंड वादळी वार्यांच्या लहरींमुळे मासळी गायब, दर कडाडले
अरबी समुद्रात उत्तरेकडून येणार्या थंड वादळी वार्यांच्या लहरींमुळे किनारपट्टीवरील मच्छिमारी व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. खोल समुद्रातील पाणी गारठल्याने मासळी मिळेनाशी झाली असून, जिल्ह्यातील सुमारे ३०० हून अधिक मच्छिमार बोटी रिकाम्या हाताने माघारी परतल्या आहेत. या संकटामुळे मच्छिमारांचे कोट्यावधींचे नुकसान झाले असून हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे.
खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे आता मच्छिमारांसाठी परवडणारे नाही. एका बोटीच्या सहा दिवसांच्या ट्रीपचा हिशोब केल्यास खर्च थक्क करणारा आहे. एका ट्रीपसाठी डिझेलचा खर्च अंदाजे ३ लाख रुपये, बर्फ एर्च २५ हजार रुपये, रेशन व पाणी (१७ कर्मचारी) २५ ते ३० हजार रुपये असा एकूण साडेतीन लाख रुपयांहून अधिक खर्च करून बोटी रिकाम्या परतत असल्याने मच्छिमार हतबल झाले आहेत. अनेकांनी सुरूवातीचे ६ दिवस मासळी न मिळाल्याने धाडस करून आणखी ६ दिवस (एकूण १२ दिवस) समुद्रात मुक्काम ठोकला, मात्र डिझेल आणि रेशन संपत आल्याने अखेर रिकाम्या बोटी किनार्यावर लावण्याशिवाय पर्याय उरला नाही.
मत्स्यदुष्काळाचा परिणाम केवळ समुद्रातच नाही, तर स्थानिक बाजारपेठांवरही झाला आहे. मासळीची आवक घटल्याने मासळी विक्रेत्या महिलांच्या उत्पन्नावर गंडातर आले आहे. विक्रीसाठी मालच उपलब्ध नसेल तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? असा आर्त सवाल महिला विक्रेत्या करत आहेत. आवक घटल्याने मासळीचे दरही कडाडले आहेत.www.konkantoday.com




