
जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे उद्घाटनजीवनात यशस्वी होण्यासाठी बाल महोत्सव उपयुक्त- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव
रत्नागिरी, दि. 6 ) : आज बालक असला, तरी उद्याचे तुम्ही नागरिक आहात. नागरिक म्हणून मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. ती पेलण्यासाठी, आव्हानांना पेलण्यासाठी बुध्दी व शरीर या दोन्ही गोष्टी असाव्या लागतात. अशा बाल महोत्सवामधून त्या यशस्वी जीवनासाठी मिळत असतात. त्यासाठी पुस्तके वाचा, मैदानी खेळ खेळा असा संदेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी दिला.
महिला व बाल विकास विभाग जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. जाधव यांच्या हस्ते आज करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश-1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. अंबाळकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव आर. आर. पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मल्लीनाथ कांबळे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, बाल न्याय मंडळाच्या सदस्य ॲड विनया घाग, बाल कल्याण समिती सदस्य ॲड. रजनी सरदेसाई, ॲड. प्रिया लोवलेकर, शिरीष दामले आदी उपस्थित होते.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. जाधव म्हणाले, मुलांचा केवळ बौध्दिक विकास करुन चालणार नाही, तर त्याबरोबरच शारीरिक मानसिक विकासासाठी त्यांच्यामधील कला, क्रीडा, कौशल्य अशा सुप्त गुणांना वाव अशा महोत्सवाच्या माध्यमातून शासनामार्फत दरवर्षी केला जातो. या बाल महोत्सवामध्ये उत्स्फूर्तपणे मुलांना भाग घेण्यासाठी, त्यांना आनंद देण्यासाठी महिला व बाल विकास प्रयत्न करीत असतो. अशा महोत्सवामधून भविष्यात येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्याची ऊर्जा मिळत असते. मैदानी खेळ, सांघिक खेळ खेळायला हवेत. त्यामधून एकमेकांचा आदर ठेवून खिळाडूवृत्ती वाढीस लागण्यास मदत होते. हार-जीत पेक्षा या महोत्सवात हिरिरीने भाग घेता हे सर्वात महत्त्वाचे आहे. असे सांगून महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबाबत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे त्यांनी कौतुक केले.
जिल्हा न्यायाधीश 1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. अंबाळकर म्हणाले, मुलांना घडविणे हे शिक्षकांचे व पालकांचे काम आहे. त्यांच्या बौध्दिक तसेच शारीरिक क्षमतेचा विकास करणे, त्यांच्यातील सुप्तगुणांना वाव देणे, यासाठी अशा बाल महोत्सवांची आवश्यकता आहे. मुलांनी अशा महोत्सवामध्ये सहभागी होणं हे जास्त आनंददायी आहे.
जिल्हा माहिती अधिकारी श्री. सातपुते म्हणाले, मन, मेंदू आणि मनगट बळकट करण्यासाठी, विकसित करण्यासाठी पुस्तक आणि मैदान जवळ करा. फेसबुक दूर करुन ज्ञान, विचार विकसित करणारे बुक हाती धरा. स्वत:मधील क्षमता सिध्द करण्यासाठी अशा महोत्सवांमध्ये नेहमी सहभागी व्हा. स्वतःला सिध्द करा.
सुरुवातीला राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि चाचा नेहरु यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. यानंतर हवेमध्ये फुगे सोडून आणि मुलांची तसेच मुलींच्या धावण्याच्या स्पर्धेने प्रत्यक्षात बाल महोत्सवाला सुरुवात करण्यात आली.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकरी मनोज पाटणकर यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा परिविक्षा अधिकारी अतिश शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. परिविक्षा अधिकारी अनिल माळी यांनी आभार प्रदर्शन केले.
000




