
रत्नागिरीमध्ये सुप्रसिध्द यु-ट्युबर सुशीलजींचे विचार कोकणवासियांना अंतर्मुख करावयास लावणारे…..
ॲड. धनंजय जगन्नाथ भावे. 9422052330
रत्नागिरीच्या क-हाडे ब्राम्हण संघाच्या दर्पणकार जांभेकर पत्रकार पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रसिध्द यु-ट्युबर श्रीमान सुशीलजी कुलकर्णी यांचे विचार ऐकण्याची उत्तम संधी दिल्याबद्दल संघाला धन्यवाद.
मविआच्या कालावधीमध्ये म्हणजेच कोरोना कालावधीमध्ये एकूणच महाराष्ट्रामध्ये चाललेल्या विविध विषयामधील विविध प्रकारच्या शासकीय गंभीर कारभाराने त्रस्त आणि संतप्त झालेल्या अनेकांना सर्वप्रथम आधार वाटला तो सुशीलजी यांच्या वाहिनीवरील स्पष्ट आणि परखड मतांच्या विचारांचा. खरे म्हटले तर त्याकाळामधील महाराष्ट्रामध्ये जे काही चालेले होते ते आणीबाणीच्या कालखंडापेक्षा काही वेगळे नव्हतेच असे वाटते. यातच सन्माननीय भाऊ तोरसेकर आणि सुशीलजींचे वाहिन्यांवरील परखड विवेचनाचा आधार वाटून अनेकांना हेही दिवस जातील असे वाटत असतांनाच तसेच घडले आणि आपण त्या अघोषित आणीबाणीमधून बाहेर पडलो.
असेच विचार आपल्याला हिंदी वाहिन्यांवरीलही यु ट्युबर्सकडून नियमित ऐकायला मिळाले तेही त्या काळामध्ये आधार वाटले.
त्या विशिष्ट काळामध्ये वाहिन्यावर समोर काही ठेऊन किवा सोबत काही रेफरन्स घेऊन बोलणे जरी सोपे नसले तरी हिम्मतीचे होते हे आता नक्कीच जाणवते. याकालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये शासकीय करोना आणि प्रत्यक्षातील वैद्यकीय कोरोना या दोन्हीच्या कात्रीमध्ये जनता सापडली होती. त्यातच बेस्ट सीएमच्या अतिरिक्त प्रेमामध्ये पडून “रेडा गाभण आहे” अश्या प्रकारे विचार मांडणारी माध्यमे यानी तर कहरच केला होता आणि म्हणूनच मा. भाऊ तसेच सुशीलजींच्या माध्यमांचा जनतेला खूप आधार वाटला होता हे नक्कीच.
तटस्थ पत्रकारीता असूच शकत नाही…श्री. सुशील कुलकर्णी यांचे रोखठोक प्रतिपादन….
आज रत्नागिरीमध्ये ऐकलेल्या सुशीलजींच्या परखड विचारांनी प्रत्यक्ष त्याची अनुभुती घेता आली याचा आनंद झाला. खरे तर विषय होता माध्यमे आणि युवकवर्गाचा. पण वेळ कदाचित सोईची नसेल किवा वाहिन्यावर सुशीलजींना ऐकणे केव्हाही फावल्या वेळात सोपे होत असेल यामुळे युवावर्गाची उपस्थिती अल्पशी होती तरीही सुशीलजींनी एका महत्वाच्या विषयाचे विवेचन केले ते स्मरणीय आणि सर्वांनाच अंतर्मुख करणारे होते यात शंकाच नाही. यु ट्युबवर त्यांचे ऐकणे किवा त्यांचे बोलणे यापेक्षा प्रत्यक्षात त्यांचा मंचावरून केलेल्या परखड विचारांचा अनुभव घेणे हा एक वेगळाच अनुभव होता.
माध्यमांची तटस्थता हा माध्यमांमधील सध्याचा विषय, जनता घेत असलेला तटस्थतेचा अनुभव एवढ्या एकाच मुद्यावर त्यांनी तासभर केलेले विवेचन अतिशय महत्वाचे असेच होते. प्रत्यक्षात नसलेल्या किवा यत्किंचित आधारही नसलेल्या समाजातील रूढी परंपरांसह अनेक विषयांवर विनाकारण चर्चा घडवून आणणे आणि तेही आम्ही तटस्थ आहोत या भूमिकेतून या आजकालच्या माध्यमांच्या डाव्या विचारसरणीच्या वृत्तीला सुशीलजी यांनी गंभीर आक्षेप घेतला आणि तो अतिशय योग्यप्रकारे मुद्देसूदपणे मांडला आणि तोही सोप्या शब्दात. उपस्थितांनाही त्याची सत्यता पटली हे त्यांच्या भाषणाचे गमक मानावे लागेल.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, आगरकर, लोकमान्य टिळक वगैरेनी वृत्तपत्रे का सुरु केली असतील याचा विचार आजही करण्याची नितांत गरज आहे. राष्ट्र सर्वतोपरी किवा सर्वप्रथम देशाचा विचार याच विशिष्ट ध्येयवादाने ती वृत्तपत्रे सुरु झाली. स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये निर्माण झालेली वृत्तपत्रे ब्रिटीश राज्यकर्ते त्यांच्या जागी कसे बरोबर होते आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी झगडणारे भारतीय क्रांतिकारक त्यांच्या बाजूने कसे बरोबर होते ही तटस्थता जनतेसमोर मांडण्यासाठी या वृत्तपत्रांची निर्मिती खचितच झालेली नव्हती. तटस्थता हा जणू पत्रकारितेचा पायाच आहे असे जनतेसमोर डाव्या विचारसरणीच्या माध्यमांनी फेक नॅरेटीव्ह मांडून आपल्याही तीच तटस्थतेची भूमिका योग्य वाटू लागली. हळू हळू याचाच परिणाम म्हणून की काय आता माध्यमे हा केवळ धंदा झाला आहे. “आम्ही तुमची बाजू मांडतो त्यांचीही मांडतो” “आमचे काय ते बोला” “जो देता वही नेता” अशी आज परिस्थिती आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे अशी खंत त्यांनी विद्यमान माध्यमांविषयी बोलतांना प्रकट केली.
किमान राष्ट्राच्या विरोधात कोणीही काहीही बोलत असेल किवा कृति करीत असेल तर त्याच्या विरोधात माध्यमातून विचार व्यक्त करणे म्हणजे तटस्थता नव्हे हा विचार माध्यमांनी आवर्जून केला पाहिजे असे आग्रही मतही त्यांनी मांडले. उपस्थित उदयोन्मुख पत्रकारांसाठी सुशीलजींचे विचार हे नक्कीच नवा विचार करायला लावणारे होते यात शंकाच नाही. तटस्थतेच्या विळख्यात असणारे नवोदित पत्रकारांना सुशीलजींचे विचार कितपत पटतील सांगता येत नाही पण आज ना उद्या तटस्थतेच्या विळख्यातून बाहेर पडून त्यांना प्रवाहाच्या विरूध्द पोहावे लागेल आणि त्या भूमिकेचा गंभीरपणे विचार करावा लागेल.
कोकणाच्या जनतेने आणि माध्यमांनी कोकणाविषयी सकारात्मक विचारांचा प्रचार करणे आवश्यक आहे नकारात्मक विचारांनी कोकणातील पर्यटनाचा –हास होईल आणि त्यामुळे विकासालाही खीळ बसेल……
कोकणातील जनतेसाठी, पत्रकारांसाठी त्यांनी अंतर्मुख होणारा विचार मांडला जो आजच्या काळामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. आजकाल आपल्या कोकणातील रस्ते गैरसोई यांचीच चर्चेचा माध्यमांवर अतिरेक होत आहे हे लक्षात घेतले पाहिजे. जो उठतो तो मुंबई-गोवा हायवे….. कोल्हापूर रस्ता..त्यामुळे होणा-या गैरसोई यांची अतिरेकी चर्चा करीत असतो आणि त्याच्याच बातम्यांनी वृत्तपत्रे रकानेच्या रकाने सतत लिहित आहेत. रस्त्याची कामे सुरु आहेत त्यासाठी जास्त वेळ लागत आहे हे कोकणातील जनतेने मान्य करून आपल्याच प्रसिध्दी माध्यमातून त्याच्याविषयी सतत बोलणे यामुळे कोकणी जनतेचे कसे नुकसान होत आहे याचा विचार करणे आज अत्यावश्यक झाले आहे. पर्यटकांनी कोकणात येऊच नये इतकी काही वाईट अवस्था वहातूकीची व्यवस्था नाही याचा अनुभव मी घेतला आहे. ज्याचे कोकणात दुकान नाही, हॉटेल व्यवसाय नाही, अन्य कोणताही व्यवसाय नाही असा कोणीही उठतो आणि आपण जणू कोकणामध्ये अतिशय त्रासदायक प्रवासाने कसे पर्यटन केले याचे वर्णन करतो आणि आपली माध्यमे त्याला कशी भर घालतात हे चित्र कोकणच्या पर्यटनाच्या दृष्टीन विदारक होणारे आहे. आपणच अशा प्रकारच्या नकारात्मक विचारांनी आपल्या विकासाचे समृध्दीचे रस्ते बंद करीत आहोत याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे असे आग्रही प्रतिपादन करतांना कोकणातील सोई-सुविधा, निसर्ग, वेगळेपणा याचे सकारात्मक आणि आश्वासक चित्र कोकणी जनतेने निर्माण केले पाहिजे नाहीतर आपणच आपली निंदा-नालस्ती करून आपले पर्यटन किवा विकास रोखणार आहोत असा इशारा सुशीलजींनी दिला. खरोखरच दूरवरच्या विदर्भातील सुप्रसिध्द विचारवंताच्या या विचारांपासूनही कोकणवासीयांनी गंभीरपणे बोध घेणे आवश्यक आहे.




