
मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांपैकी भाजप – शिवसेना शिंदे महायुतीला ११६ जागा मिळाल्या,मुंबईत भाजपला सत्तेसाठी शिंदेंची मदत!,
मुंबईची सत्ता कोणत्याही परिस्थितीत संपादन करायचीच हा निर्धार करून रिंगणात उतरलेल्या भाजप – शिवसेना शिंदे गटाला काठावरचे बहुमत मिळाले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दिलेल्या कडव्या झुंजीमुळे महायुतीसाठी ही लढत शेवटपर्यंत आव्हानात्मक ठरली. काँग्रेस आणि एमआयएमला अनपेक्षित यश मिळाले.
मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांपैकी भाजप – शिवसेना शिंदे महायुतीला ११६ जागा मिळाल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाला ६६ तर मनसेला सात जागा मिळाल्या. काँग्रेसला २४, एमआयएमला आठ जागांवर विजय मिळाला. भाजपने १५० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा दावा केला होता. परंतु महायुतीची गाडी ११६ वरच अडकली. याउलट ठाकरे बंधूंना तुलनेत चांगल्या जागा मिळाल्या आहेत. मराठी – अमराठी मुद्द्यावर वळण घेतलेल्या या निवडणुकीत मराठी बहुल प्रभागांमध्ये ठाकरे बंधूंना चांगला पाठिंबा मिळाला. त्याच वेळी मराठी तसेच अमराठी मतदार भाजपच्या पाठीशी उभे राहिले.




