
चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे सदनिकेचा ताबा न देता ३ लाखाची फसवणूक
इमारतीमध्ये सदनिका विकत देतो, असे सांगून ९ लाखापैकी ३ लाखाची फसवणूक केल्याची घटना २०२३ ते २०२५ या कालावधीत घडली. या प्रकरणी फसवणूक करणार्या दोघांवर मंगळवारी सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सोजेन कुरिसिंगल एफ्राईम, दीपक सखाराम सावर्डेकर (दोन्ही रा. डेरवण) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद राजलक्ष्मी अय्यर (४९, सध्या डेरवण, मूळ-मालाड, मुंबई) यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोजेन एफ्राईम, दीपक सावर्डेकर यांनी फ्रेंड्स डेव्हलपर्सच्या फ्रेंड्स’ हाईटस, कुडप फाटाशेजारी सावर्डे येथील इमारतीमध्ये सदनिका विकत देतो, असे राजलक्ष्मी अय्यर यांना सांगितले होते. त्यानुसार अय्यर यांच्याकडून रोख रक्कम ९ लाख रुपये स्वीकारून सदनिकेचा ताबा मात्र दिलेला नाही. त्यांना तसेच अय्यर यांनी बुकिंगसाठी दिलेली रक्कम परत करण्याची मागणी केल्यावर एफ्राईम, सावर्डेकर यांनी ९ लाख रुपयांपैकी ६ लाख परत केले. मात्र ३ लाख रुपये परत न करता फसवणूक केली. या प्रकरणी पोलिसात देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार एफ्राईम, सावर्डेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com




