
कोकणचे पाणी कोकणलाच द्या, ऍड. विलास पाटणे यांची मागणी.
आज पुन्हा एकदा कोकणातील पूरप्रवण परिस्थिती निवारण्यासाठी कोकणातील पाणी मराठवाड्याकडे वळवणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावेळी उत्तर देताना केली. यावर ऍड. विलास पाटणे यांनी कोकणचे पाणी कोकणालाच मिळाले पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे.
कोयना धरणातील ६८ टीएमसी पाणी वीजनिर्मितीनंतर चिपळूणमधील वाशिष्ठी नदीमार्गे अरबी समुद्रात सोडले जाते. हे वाहून जाणारे पाणी २९० किलोमीटर अंतरावरील मुंबईत जलवाहिन्यांमधून आणण्याचा प्रस्ताव नव्याने आला आहे. त्यासाठीचे हवाई सर्वेक्षण व्हॅस कॉम कंपनीने नुकतेच पूर्ण केले. या हवाई सर्वेक्षणासाठी ३८ कोटी इतका खर्च झाला. पाटबंधारे विभागाचे माजी सचिव म. दी. पेंडसे समितीने कोयनेच्या पाण्याचा वापर आधी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यासाठी व शेतमळ्यांना शेतीसाठी करावा, असे म्हटले होते. कोयना धरणातून बाहेर पडणार्या ६८ टीएमसी पाण्यापैकी १८ टीएमसी पाणी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याला देण्यात येईल. उर्वरित ५० टीएमसी पाणी पाईपलाईन मुंबईला वळविण्यात येईल. प्रत्येकवेळा नवीन योजना व नवीन घोषणा. परंतु ही योजना आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या परवडणारी नाही. समुद्रसपाटीपासून कोकणची उंची सर्वसाधारणपणे ८० मीटर आहे. कोकणातील पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यातील पूर्व वाहिनी नद्यांमध्ये वळविण्यात प्रचंड ऊर्जा खर्च होईल, असे ऍड. विलास पाटणे म्हणाले.
www.konkantoday.com




