
रत्नागिरी शहरात ‘जायंट आफ्रिकन स्नेल’ अर्थात् गोगलगाय आढळली
रत्नागिरी शहरातील आकाशवाणी केंद्राच्या संरक्षक भिंतीवर ‘जायंट आफ्रिकन स्नेल’ अर्थात् गोगलगाय आढळली आहे. हा परदेशी प्रजातीचा शंखप्राणी असून, रत्नागिरीमध्ये प्रथमच दिसला आहे. पर्यावरणातील बदलामुळे हा प्राणी येथे आढळल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे.त्यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात व रत्नागिरीतील दापोली येथे या प्रजातीचा शंखप्राणी सापडला होता.
‘जायंट आफ्रिकन स्नेल’ या गोगलगायीचे शरीर लांबट असते. अंगावर तपकिरी पट्टेदार कवच असून, लांबी १० ते २० सेंटीमीटर आहे. ही गाेगलगाय मुख्यत: वनस्पतींच्या हिरव्या भागांवर उपजीविका करते आणि त्यामुळे शेती, पिकांचे नुकसान होते. गोगलगाय रोगकारक जंतू वाहून नेत असल्यामुळे मनुष्य व पाळीव प्राण्यांच्या आरोग्यावर तिचा परिणाम होऊ शकतो.
या गोगलगायीचे वैशिष्ट्य म्हणजे अँजिओस्ट्राँगिलस कॅन्टोनेन्सिस नावाच्या परजीवी कृमीचा वाहक असू शकतो. हा परजीवी मानवाच्या शरीरात गेल्यास मेंदूज्वरासारखा आजार होऊ शकतो. संक्रमित शंखप्राणी हाताळताना किंवा त्याच्याशी थेट संपर्क आल्यास दूषित स्रावामुळे संक्रमणाचा धोका वाढतो. त्यामुळे या गाेगलगायीला हात लावू नये, असे आवाहन पर्यावरणतज्ज्ञांनी केले आहे.




