
रत्नागिरीत २०२५ ला जल्लोषात निरोप
रत्नागिरी : सरत्या वर्षातील सूर्यास्त पाहण्यासाठी शहरातील मांडवी, भाट्ये समुद्र किनाऱ्यांसह जिल्ह्यातील सर्वच किनाऱ्यांवर आज पर्यटकांनी आणि स्थानिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे किनाऱ्यांना जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. २०२६ च्या स्वागतासाठी आतुर झालेल्या पर्यटकांसह स्थानिकांनीही २०२५ च्या मावळतीच्या सूर्याला गुडबाय करत जल्लोषात निरोप दिला.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जिल्ह्यात पुणे, मुंबई, कोल्हापूरसह नागपूर, लातूर, मराठवाडा येथून पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात दापोली, गुहागर, रत्नागिरीत आले आहेत. नाताळच्या सुट्टीचे निमित्त साधत गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात आलेल्या पर्यटकांची संख्या लाखोंच्या घरात गेली आहे. यंदा महाराष्ट्राबाहेरून येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय असून, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी कोकणाला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) निवास व्यवस्थेसह सर्व हॉटेल्स, लॉज, खासगी निवास व्यवस्था सर्वच फुल्ल झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
आज (३१ डिसेंबर) २०२५ या इंग्रजी वर्षातील शेवटचा दिवस. या शेवटच्या दिवशी सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने आलेल्या पर्यटकांची पावले आपसूकच भाट्ये, मांडवी, गणपतीपुळे, गुहागर, हर्णै, दापोली समुद्रकिनारी वळत होती. दुपारनंतर भाट्ये, मांडवी या समुद्रकिनाऱ्यांना अक्षरशः जत्रेचे रूप आले होते. किनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची मोठीच मोठी रांग होती, तर पार्किंग व्यवस्थाही अपुरी पडत असल्याने अनेकांना ताटकळत राहण्याची वेळही आली; मात्र २०२५ चा सूर्यास्त पाहण्यासाठी किनाऱ्यावर वेळेत पोहोचलेले मात्र सेल्फी, फॅमिली फोटो, व्हिडीओ, रील या माध्यमांतून अनुभवत असलेले हे क्षण कैद करण्याची धडपड करत होते.
दरम्यान, लाखोंच्या संख्येने आलेल्या पर्यटकांमुळे स्थानिक व्यावसायिक मात्र सुखावला असून हॉटेल, मच्छी, निवास व्यवस्था, प्रदर्शन आदींच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांत कोट्यवधींची उलाढाल झाल्याचे सांगण्यात येत आहे.




