
पर्यटकांची शिवसृष्टीकडे गर्दी मात्र खड्डेमय रस्त्यांमुळे पर्यटक नाराज…
रत्नागिरीचा ऐतिवासिक वारसा आणि पर्यटनाला नवी झळाळी देण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी कोट्यवधी रुपये खर्च करून भव्य शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासाचे दर्शन घडवणार्या या प्रकल्पाने अल्पावधीतच जगभरातील पर्यटकांना आकर्षित केले असून दररोज लाखो पर्यटक या ठिकाणी भेटी देत आहेत. मात्र या भव्य प्रकल्पांचा आनंद घेण्यासाठी जाणार्या पर्यटकांना रत्नागिरी शहर ते शिवसृष्टी या मुख्य मार्गावरील खराब रस्त्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रत्नागिरी शहरातून शिवसृष्टीकडे जाणार्या या मार्गावर सध्या प्रचंड खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या मार्गासमोरून गाडी चालवताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे डांबर पूर्णपणे उखडून गेल्याने केवळ खडी आणि माती उरली आहे. यामुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शिवसृष्टी पाहण्यासाठी येणारे पर्यटक मोठ्या उत्साहाने येतात, परंतु या मार्गावरील खड्ड्यांमुळे त्यांचा प्रवासाचा आनंद पूर्णपणे विरून जात आहे. अनेक पर्यटकांनी या दुरवस्थेबद्दल थेट नाराजी व्यक्त केली असून एकीकडे कोट्यवधींचे प्रकल्प उभे केले जात असताना सध्या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
www.konkantoday.com




