
निवखोल (रत्नागिरी) परिसरात बिबट्याचा वावर
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी शहराध्यक्ष परशुराम उर्फ दादा ढेकणे तसेच युवा जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर, माजी युवा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश केळकर, पदवीधर सेलचे मनोज पाटणकर व समीर वस्ता यांच्या उपस्थितीत शहरातील निवखोल परिसरातील बिबट्याच्या हालचालींच्या तक्रारीनंतर वनविभागाकडे निवेदन देण्यात आले.
निवखोल परिसरातील नागरिकांनी अलीकडील काळात बिबट्याचा वावर दिसल्याची माहिती दिली असून, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, गस्त वाढवावी व आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
वनविभागाने हे निवेदन स्वीकारत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच नागरिकांनीही सतर्क राहावे व बिबट्याच्या हालचाली दिसल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागाकडून तसेच भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.




