
पाचाड गावचे माजी सरपंच,ठेकेदार व भाजप कार्यकर्ते अनिल मारुती चिले यांना तीन अज्ञातानी केली बेदम मारहाण
चिपळूण तालुक्यातील पाचाड गावचे माजी सरपंच,ठेकेदार व भाजप कार्यकर्ते अनिल मारुती चिले (58, रा.पाचाड, चिलेवाडी ) यांची कार अडवून तिघा अज्ञातांनी बेदम मारहाण केल्याची घटना गुहागर बायपास रोडवरील लेणी परिसरात शुक्रवारी रात्री घडली.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या मारहाणीत अनिल चिले गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात तिघा अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल चिले हे त्यांच्या कारने एकटेच गुहागर बायपास रोडने पाचाड येथे आपल्या घरी जात होते. शनिवारी रात्री 9.10 वाजण्याच्या सुमारास या मार्गावर प्रवास करत असताना एका वळणावर ते आले असता त्यांच्या पाठीमागून एका दुचाकीवर तीन अनोळखी व्यक्ती आल्या. त्यांनी ही दुचाकी चिले यांच्या कारच्या समोर आडवी उभी केली. त्या तिघांपैकी एकजण त्याच्या कारजवळ आला व त्याने ‘आमच्या दुचाकीला डॅश देऊन तुम्ही पळून जाता काय’ असे बोलत असताना त्याच्या सोबत असणाऱ्या दोघांनी ‘तुम्ही खाली उतरा असे’ चिले यांना बोलू लागले. त्यावर चिले म्हणाले ‘जर माझ्या कारची डॅश झाली असेल तर मी खर्च देण्यास तयार आहे’ असे बोलत असताना त्यांनी चिले यांना कारच्या बाहेर खेचून काढले व त्यांना रस्त्यावर खाली पाडून बेदम मारहाण केली.
यात चिले हे गंभीर जखमी झाले आहेत. या मारहाणीनंतर त्या तिघा अज्ञातांनी तेथून पलायन केले. घटनास्थळी पोलिसांना एक मोबाईल सापडला तर एक बूट अढळला. एखाद्या फिल्मी स्टाईलने घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.




