
चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथे पोलिसांनीकत्तलीसाठी कत्तलखान्याकडे जाणारा गोवंश पकडला
चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथे पोलिसांनी कारवाई करत कत्तलीसाठी कत्तलखान्याकडे जाणारा गोवंश पकडला आहे. बोलेरो गाडीतून अत्यंत निर्दयतेने कोबून बैलांची वाहतूक करणाऱ्या तिघांविरोधात अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास शिरगाव येथील शिवाजी चौक परिसरात करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी तीन बैल, बोलेरो गाडी आणि एक छकडा असा एकूण ५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेडकडून चिपळूण, शिरगाव आणि कुंभार्ली घाट मार्गे सांगली जिल्ह्यातील मायणी येथे कत्तलीसाठी जनावरे नेली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप (एम.एच.११.डीव्ही.०४८१) या गाडीची तपासणी केली असता, त्यात तीन बैल आढळून आले. ही जनावरे गाडीच्या हौद्यातील छोट्याशा जागेत अत्यंत दाटीवाटीने, निर्दयतेने आखूड दोरीने मानेला बांधून ठेवण्यात आली होती, ज्यामुळे त्यांना वेदना व यातना होत होत्या. याप्रकरणी संकेत रघुनाथ जाधव (वय २७, रा. कुंभळी, घागवडी, ता. चिपळूण) यांनी तक्रार दाखल केली आहे.
या बेकायदेशीर वाहतूक प्रकरणी पोलिसांनी सचिन रंगराव चव्हाण (वय ३०, रा. लोटे, आवाशी ता. खेड), सचिन मुरलीधर चव्हाण (वय २५, रा. खवटी, ता. खेड) आणि रुद्र राजेंद्र दळवी (वय १७, रा. गुणदे, देवुळवाडी, ता. खेड) या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.



