
कोकणाचं कोकणपण ही टिकवलं पाहिजे : प्रसाद गावडे
कोकण हा केवळ भौगोलिक परिसर नाही तर पर्यावरणासोबत जगण्याची संधी आहे. पण दुर्दैवानं कोकणचे जे चित्र समाज माध्यमांवर दिसतंय ते तेवढंच आहे. प्रत्यक्षात आपण खूप काही गमावतोय. जगण्याचं डॉक्युमेंटेशन केलं पाहिजे. साहित्य निर्मिती करताना कोकणाचं कोकणपण ही टिकवलं पाहिजे, असे विचार “कोकणी रानमाणूस” अर्थात प्रसाद गावडे (सिंधुदुर्ग) यांनी “युवा आणि मराठी साहित्याची नवी वाट” या परिसंवाद व्यक्त केले. कोकणातील स्थलांतर, रोजगारनिर्मिती, इको टुरिझम, दलालांची भर तसेच शाश्वत जीवनशैली यावरही त्यांनी आपल्या खास शैलीत परखड भाष्य केले.
महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (मुंबई) आणि नवनिर्माण शिक्षण संस्था यांच्या वतीने २२ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ते रत्नागिरीत आले होते. त्यावेळी त्यांनी मांडलेली अनेक मते, विचार उपस्थितांना भारावून टाकणारे होते. या परिसंवादात कोकणासाठी झटणारे प्रसाद गावडे यांच्यासह चिपळूणचे युवा कार्यकर्ते मल्हार इंदुलकर, पत्रकार दुर्गेश आखाडे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुहास बारटक्के आणि ज्येष्ठ साहित्यिक मदन हजेरी उपस्थित होते.
प्रसाद गावडे म्हणाले, “कोकणातला ग्रामीण कष्टकरी तरुण शिकत आहे; मात्र आपल्या आजूबाजूला दिसणारे वास्तव तो मांडत नाही. अलीकडे मी कडवई (ता. संगमेश्वर) गावात येऊन गेलो. कोकणातला मुस्लिम कसा जगतो, संस्कृती परंपरा कशी जपतो यावर मालिका केली. त्यावर तरुणांनी केलेल्या “कमेंट” विचार करायला भाग पाडणाऱ्या होत्या. जाती-धर्माच्या पलीकडे असणारे कोकणातले तरुण आता एकाच प्रकारच्या विचार शैलीत बांधले जात आहेत. धर्मांध होत आहेत, हे जाणवले. कोकणासाठी हे घातक आहे. बाहेरून आलेली एक युवती रापणावर पीएचडी चा अभ्यास करत होते. मात्र सिंधुदुर्गात आता केवळ दोन ठिकाणी रापण होते. याची जाणीव ही झाली. आपण संपतेय, कोकण संपतोय. म्हणूनच लिहिणारा तरुणही निर्माण होणे गरजेचे आहे.” आपण जे लिहितोय, जे दाखवतोय त्याची कदाचित विक्री ही होऊ शकते, अशी भीतीही त्यांनी परिसंवादादरम्यान व्यक्त केली.
पत्रकार दुर्गेश आखाडे यांनी तरुण लिहितात मात्र त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे असे सांगतानाच कोकणातून अनेक नावे राज्य पातळीवर जायला हवी अशी माफक इच्छा त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ साहित्यिक मदन हजेरी यांनी आजचा युवा लेखक हा समाज माध्यमांवरून थेट वाचकांना जाऊन भिडतो असे सांगितले. युवा लेखक नेहमी निडर असतात. त्यामुळे केवळ प्रेमभावना चारोळ्या याचेच लिखाण न करता भवताल ही व्यक्त करता आला पाहिजे संवेदनशीलता ही जपली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.
मल्हार इंदुरकर याने आपण स्वतःच्या सोयीनुसार विचार करतो हे साहित्यासाठी धोकादायक असल्याचे सांगतानाच बोलीभाषा जपल्या जातील तेव्हाच साहित्यही जपले जाईल म्हणूनच बोली भाषेत मूळ पुस्तक यायला हवे, असे सांगितले.
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुहास बारटक्के यांनी आजच्या तरुणांचे विचार वेगळे आणि साहित्याच्या कल्पनाही बदललेल्या आहेत शाश्वत काहीच नाही असे सांगताना हे चित्र आश्वासक असल्याचेही नमूद केले. साहित्य विषयी बोलताना या युवकांना “एआय”शी ही झगडायचे आहे. “चॅट जीपीटी”चे साहित्यावर होणारे संक्रमण जास्त आहे. आजचे युवक आशावादी, सजग आहेत आणि ते साहित्यात नवीन काहीतरी घेऊन येतील आणि ते चांगलेच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
परिसंवादाचे अध्यक्ष जयू भाटकर यांनी सहभागी सहकाऱ्यांच्या विचारांचा गोषवारा करतानाच मराठी साहित्य डिजिटल चे कितीही युग आले, तरी साहित्यात डिजिटल माध्यमाच्या मर्यादा असल्याचे सांगितले.




