
भारतीय वास्तुविशारद संस्थेचे रत्नागिरीत केंद्र सुरू होणार
१०८ वर्षांची संस्था प्रथमच रत्नागिरीत, कोकणासाठी मोठी संधी उपलब्ध
रत्नागिरी : भारतीय वास्तुविशारद संस्था (IIA) ही भारतातील वास्तुविशारदांची राष्ट्रीय व्यावसायिक संघटना आहे. १९१७ साली स्थापन झालेल्या या संस्थेचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रत्नागिरीत ‘रत्नसिंधू केंद्र’ सुरू होणार आहे, ही कोकणासाठी मोठी उपलब्धी आहे, अशी माहिती या केंद्राचे मानद संचालक मार्गदर्शक आर्किटेक्ट संतोष तावडे यांनी दिली.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात वास्तुविशारद (आर्किटेक्ट) म्हणून अनेक जण कार्यरत आहेत. या सर्वांना एकत्रित आणून हे केंद्र सुरू करण्यासाठी गेली दोन-तीन वर्षे प्रयत्न सुरू होते. आता त्याला यश आले आहे. यामुळे आर्किटेक्ट क्षेत्राकडे जिज्ञासू युवा पिढी वळेल. तसेच आर्किटेक्चर संदर्भाने समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र कार्यरत राहणार आहे, असे श्री. तावडे म्हणाले.
बॅचलर ऑफ आर्किटेक्चर अशी पदवीधारक तसेच सीओए अंतर्गत आर्किटेक्ट कायद्यानुसार सनद प्राप्त आर्किटेक्टची ही संघटना आहे. या संस्थेचे आज ३० हजारांहून अधिक सदस्य आहेत. स्थापत्यकलेची सौंदर्यदृष्टी, शास्त्रीयता आणि कार्यक्षमता वाढवणे तसेच शिक्षण व व्यवसाय या दोन्ही क्षेत्रांत दर्जा उंचावण्याकरिता संस्था विविध उपक्रम राबवते. संस्थेची सर्व केंद्रे राष्ट्रीय परिषदेच्या मान्यतेनुसार स्वतःच्या नियमावलीनुसार चालवण्यात येतात.
१२ मे १९१७ रोजी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टर्स परिसरात वास्तुविशारद विद्यार्थी संघटना या नावाने संस्थेची सुरवात झाली. त्यानंतर विविध टप्पे पार करत २ सप्टेंबर १९२९ रोजी भारतीय वास्तुविशारद संस्थेची स्थापना झाली. प्रकाशने, व्याख्याने, परिषद, प्रदर्शने इत्यादींच्या माध्यमातून समाजाशी संवाद साधते. संस्था दरमहा एक मासिक प्रकाशित करते. संस्थेचे राष्ट्रीय अधिवेशनही होत असते. स्थापत्यकलेचा अभ्यास प्रोत्साहित करणे, व्यवसायातील मानके उंचावणे, परस्पर सहकार्याद्वारे सर्व भारतीय स्थापत्यकारांचे हितसंबंध जपणे, असे संस्थेचे उद्देश आहेत. संस्थेचे मुख्यालय फोर्ट, मुंबई येथे आहे. या सर्व गोष्टी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात या केंद्राद्वारे सुरू करण्यात येणार आहेत.




