
प्रचारासाठी वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक लावणे, झेंडे लावणेसाठीचे निर्बंध
रत्नागिरी, दि. 6 ) : राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक 2025 साठीचा कार्यक्रम दि. 4 नोव्हेंबर 2025 घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. या निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक लावणे, झेंडे लावणे इत्यादी बाबीसाठी बंधन घालणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी राज्य निवडणूक आयोगाकडील दि. 04 नोव्हेंबर 2025 रोजीचे आदेशान्वये देण्यात आलेल्या निर्देशास अनुसरुन तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहीता, 2023 चे कलम 163 अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (आचारंसहिता कालावधीत) या आदेशान्वये खालील प्रमाणे निर्बंध घातले आहेत.
- फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजुला विंड स्क्रिन ग्लासच्यापुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासून 2 फूट उंची पेक्षा जास्त राहणार नाही.
- प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजुने लावण्यात यावा, इतर कोणत्याही बाजुस तो लावता येणार नाही.
- फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष् प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहना व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही.
प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशात म्हटले आहे.
0000




