
चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील ग्रामविकासाला चालना
पाच ग्रामपंचायत इमारतींसाठी १ कोटींचा निधी मंजूर... आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांना मोठे यश
चिपळूण : चिपळूण-संगमेश्वर मतदार संघातील ग्रामविकास योजनांना गती देत आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत चिपळूण तालुक्यातील तिवरे, निरबाडे, वालोटी आणि संगमेश्वर तालुक्यातील किरडुवे व फणसवले या गावांसाठी नवीन ग्रामपंचायत इमारती बांधण्याकरिता तब्बल १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे संबंधित गावांमधील प्रशासनिक कार्यकाज अधिक सुसूत्र, पारदर्शक आणि नागरिकांना सुलभ होणार आहे. गाव पातळीवरील लोकाभिमुख सुविधा उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण पायाभूत सुविधांना बळकटी देणे हा आमदार शेखर निकम यांचा प्रमुख ध्यास असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
मतदार संघात विविध विकासकामांसाठी आमदार निकम सातत्याने पाठपुरावा करत असून त्याचे फलित म्हणून रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामविकासाशी संबंधित कामांना गती प्राप्त झाली आहे. या नव्या मंजुरीमुळे ग्रामीण विकासाला अधिक उर्जा मिळून गावांचे सर्वांगीण चित्र बदलण्यास मदत होणार आहे.
विकास कामांबाबत जनतेच्या अपेक्षा ओळखून त्यांची पूर्तता करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या आमदार शेखर निकम यांची ही भूमिका ग्रामीण भागासाठी आधारस्तंभ ठरत असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.




