
दाभोळ येथे वाघ बारशी उत्साहात साजरी

दापोली : तालुक्यातील दाभोळ येथे वसलेल्या सात बायांचा आसरा-आयांचे पाणी या मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाघ बारशी उत्साहात साजरी करण्यात आली. ही देवी नवसाला पावणारी आणि प्रसाद ग्रहण केला तरी मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारी अशी या देवीची ख्याती आहे.
कार्तिक शुद्ध द्वादशी किंवा तुळशी विवाह प्रारंभ या दिवशी येथे सात बायांचा उत्सव साजरा करून वाघबारशी ही प्रामुख्याने जाधववाडी आणि ग्रामस्थ साजरी करतात. या दिवशी येथे महाप्रसाद होतो. सुमारे ५०० भक्तगणांनी याचा लाभ घेतला.
सात बायांचा आसरा-आयांचे पाणी हे मंदिर दाभोळमधील श्री स्वयंभू चंडिका मंदिर आणि देवी इंगळाई मंदिराएवढेच सुंदर आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले पवित्र मंदिर आहे. दाभोळमधील बाजार विहिरीच्या पुढील जाधववाडी लगत डोंगरावर साधारणतः दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर हे मंदिर असून, मंदिरात जाण्यासाठी डोंगराची पाऊल वाट आहे.
निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे सुंदर ठिकाण पाहून मन प्रसन्न होते. बाजूला सतत वाहणारा पाण्याचा झरा आहे. जाधव वाडी मधील सर्व ग्रामस्थ वाघबारशी गुण्यागोविंदाने साजरा करतात. काही मंडळी नवस फेडण्यासाठी मुंबई वरून येतात. देवदर्शनासाठी ही येथे गर्दी असते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवज्योत मित्र मंडळ जाधववाडी दाभोळ यांनी मेहनत घेतली.




