
खेडशी डफळचोळवाडीत आता बिबट्याची दहशत
शहरानजीकच्या खेडशी डफळचोळवाडी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वन्यप्राण्यांची दहशत वाढली आहे. शेतकर्यांचे मोठे नुकसान करणार्या गव्यांचा प्रश्न अजून सुटलेला नसतानाच आता बिबट्याच्या दहशतीची भर पडली आहे. २८ ऑक्टोबरच्या पहाटे १.४५ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने वाडीतील एका रहिवाशाच्या अंगणात झोपलेल्या कुत्र्यांवर हल्ला केला. ही घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून यामुळे आधीच भयभीत असलेल्या ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
खेडशी डफळचोळवाडीतील रहिवासी चंद्रकांत होरंबे यांच्या घराच्या अंगणातील सीसीटीव्ही कॅमेरात मंगळवारी पहाटेच्या वेळी बिबट्या स्पष्टपणे कैद झाला आहे. गव्यांच्या सततच्या उपद्रवामुळे शेतीचे नुकसान होत असताना वनविभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यातच आता या बिबट्याच्या संचारामुळे येथील नागरिकांची झोप उडाली आहे. डफफळचोळवाडीतील अनेक तरुण एमआयडीसी परिसरात कामाला आहेत. त्यांची दुसरी शिफ्ट सुटण्याची वेळ ही मध्यरात्रीची असते. अशावेळी बिबट्या व गव्यांचा मुक्त संचार पाहता हे तरुण रोज जीव मुठीत घेऊन घरी परतत आहेत. या वन्यप्राण्यांमुळे रात्री-अपरात्री बाहेर पडणे नागरिकांसाठी धोकादायक बनले आहे. आधीच या परिसरात गव्यांनी केलेले नुकसान व त्यांची दहशत अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र वनविभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा सूर ग्रामस्थांमध्ये आहे.www.konkantoday.com



