
आगामी निवडणुका “मनसे” सोबत एकत्र लढणार : आमदार भास्कर जाधव
गुहागर : आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती नगरपंचायत निवडणुका आपण शिवसेना आणि मनसे एकत्रितपणे लढू या असा प्रस्ताव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यासमोर ठेवला. मी तो तात्काळ मान्यही केला आणि यापुढे दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुका लढवणार असल्याची माहिती गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी दिली.
विधानसभेच्या वेळेला माझ्याविरुद्ध उभे असणाऱ्या मनसेच्या प्रमोद गांधी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी माझी येऊन भेट घेतली आणि आपण पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुका एकत्रितपणे लढवू या असा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला तो प्रस्ताव मला मान्य असल्याचे आमदार भास्कर जाधव यांनी बोलताना सांगितले.
“मी त्यांना सांगितलं आहे की वास्तवाचं भान ठेवून आपण निर्णय घेऊ या. अवास्तव मागण्या नको करू या. हा निर्णयही मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मान्य आहे. त्यामुळे आगामी होणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांच्याबरोबर युती आणि आघाडी ही निश्चित होणार आहे. त्यांच्या समोर बसल्यानंतरच उर्वरित उमेदवारांची घोषणा केली जाईल,” असे आमदार जाधव यांनी पत्रकारांना सांगितले.




