
कुणबी एल्गार मोर्चाला फसवलं, आता तीव्र आंदोलन
लाखो कुणबी बांधवांच्या विशाल कुणबी एल्गार मोर्चाने सरकारला दिलेले आश्वासन केवळ पोकळ ठरले आहे. मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आझाद मैदानात कुणबी बांधवांना ८ दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तीन आठवडे उलटूनही या बैठकीचा पत्ता नाही. यामुळे कुणबी समाजोन्नती संघ आणि सर्व संलग्न संघटनांनी सरकारविरोधात तीव्र अंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यासाठी २६ ऑक्टोबर रोजी महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे.
ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी आणि कुणबी नावाने मराठ्यांची ओबीसीत होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी २ सप्टेंबर २०२५ चा शासन निर्णय रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी कुणबी समाजोन्नती संघ, जिजाऊ संघटना, बळीराज सेना, कुणबी सेना, ओबीसी जनमोर्चा, यांस अनेक संघटनांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात विराट मोर्चा काढला होता. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे व पालघरसह कोकणातील लाखोच्या संख्येने कुणबी बांधव या एल्गारमध्ये सहभागी झाले होते. यावेळी शिष्टमंडळाला सामोरे जाताना मुंबईचे पालकमंत्री लोढा यांनी निवेदन स्विकारले आणि अवघ्या ८ दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत प्रश्न सोडविण्यासाठी बैठक लावण्याचे ठोस आश्वासन दिले होते. मात्र आज ३ आठवडे झाले तरी बैठकीची कोणतीही माहिती नाही, याबद्दल कुणबी बांधवांनी तीव्र संताप व्यक्त करत हा सरळसरळ कुणबी बांधवांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. असा आरोप कुणबी एल्गार मोर्चा, कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईचे प्रवक्ता सुरेश भायजे यांनी केला आहे.
www.konkantoday.com




