
गुहागर तालुक्यामधील पालपेणे येथे सोललेल्या खैराची विनापरवाना वाहतूक; वनविभागाची कारवाई
गुहागर तालुक्यातील मौजे कुंभारवाडीतर्फे पालपेणे येथे सोललेल्या खैराची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या गाडीवरती वन विभागाची कारवाई झाली आहे. मौजे कुंभारवाडीतर्फे पालपेणे येथे गेले कित्येक दिवस खैर चोरीच्या अनेक तक्रारी होत होत्या; मात्र कोणताही सबळ पुरावा नसल्याने याकडे दुर्लक्ष केले जात होते.
मात्र काल (२३ ऑक्टोबर) पालपेणे येथे रस्त्याच्या कडेला एका बोलेरो गाडीमध्ये खैराचे लाकूड भरताना स्थानिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ वन विभागाला कळवल्यानंतर वनविभागाचे अधिकारी अमित निमकर यांनी तत्काळ जागेवर येऊन त्या गाडीवर कारवाई केली.
या कारवाईमध्ये पालपेणे येथील सोन्या पालकर यांच्या जमिनीतील (अज्ञात इसमाने तोडलेले) एक लाख रुपये किंमतीचे खैराचे लाकूड तसेच चिपळूण तालुक्यातील उभळे गावातील विराज चव्हाण यांच्या नावे असलेली पाच लाख रुपये किमतीची बोलेरो गाडी वन विभागाने जप्त केली आहे.
या कारवाईमुळे गुहागर तालुक्यातील खैर चोरांचे धाबे दणाणले आहेत.




