रत्नागिरीतील रस्ते केलेल्या ठेकेदारांची एक श्वेतपत्रिका काढावी; शहरात टिकणारे रस्ते होणार आहेत की नाही, याबाबत सष्टीकरण द्यावे

पत्रकार परिषदेत शिवसेना उपनेते बाळ माने यांनी घेतला खरपूस समाचार

रत्नागिरी : “पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की स्मार्ट सिटी अंतर्गत रत्नागिरी शहराचा विकास होणार आहे. ती विकासकामे ज्ञाती कंपनी करणार आहे. आता ही ज्ञाती कंपनी आली कुठून हा इतिहास आम्ही जनतेसमोर लवकरच आणणार आहोत; पण यापूर्वी रत्नागिरी शहरातील रस्ते कोणत्या ठेकेदारांनी केले. त्याची एक श्वेतपत्रिका काढावी. रत्नागिरी शहरात टिकणारे रस्ते होणार आहेत की नाही? याबाबत सष्टीकरण द्यावे,” अशी मागणी करतानाच “आम्ही जेव्हा रस्ता रोको केला, तेव्हा यांचे लाभार्थी पुढे आले व आमच्यावर टिका करताना शिरगावातील आम्ही केलेल्या रस्त्यावर खड्डे पडले अशी दिशाभूल केली. आमचे आंदोलन होईपर्यंत हे लाभार्थी होते कुठे? त्यांना खड्डे पडले हे माहित नव्हते का”, असे सवाल उपस्थित करत “आमच्या नादाला लागू नका”, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार बाळ माने यांनी दिला.

काल (१८ ऑक्टोबर) माजी खासदार विनायक राऊत यांच्या रत्नागिरीतील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, शहर संघटक आणि युवासेना जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत आदी शिवसैनिक उपस्थित होते.
बाळ माने म्हणाले की, “शहरातील रस्त्यांची जी दयनीय अवस्था झाली आहे त्याला जबाबदार पालकमंत्री उदय सामंत आहेत.पाचवेळा निवडून आलो असे सांगून विकासाचे स्वताला धनी मानतात तसे पालकमंत्री म्हणून ते अपयशाचे धनी आहेत. खड्डेमय रस्त्यांच्या विरोधात आम्ही रस्तारोको केला. त्याचवेळी पालकमंत्री उदय सामंत हे मारूती मंदिर येथून विमानतळाकडे गुर्मीत निघून गेले. लोक रस्त्यावर थांबली असताना ते थांबले नाहीत. त्यांना सत्तेची मस्ती आणि पैशाचा माज चढला आहे.”
मला अशी माहिती मिळाली आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदय सामंत यांच्या उद्योग खात्यात स्वतंत्र सल्लागार नेमला आहे. त्याच्या शिवाय फाईल पुढे जात नाही, हा आमच्या उद्योगमंत्र्यांचा अपमान असल्याचा मिश्किल टोला उपनेते माने यांनी लगावला.

सुरतवरून गुवाहाटी फिरलात कुणाला कपटी म्हणता?
दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीत आले तेव्हा विरोधक कपटी आहेत, अशी टीका त्यांनी केली. तुम्ही कुणाला कपटी म्हणता? कुठे होतात तुम्ही? स्वर्गीय आनंद दिघे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तुम्हाला पुनर्जन्म दिला त्यांना तुम्ही कपटी म्हणता? गद्दारी करून सुरतवरून गुवाहाटीला गेलात. मग सांगा कोण कपटी? असा सवाल बाळ माने यांनी एकनाथ शिंदे यांना विचारला.

रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालय आणल्याचे पालकमंत्री उदय सामंत सांगतात. आज त्या महाविद्यालयात प्राध्यापक नाहीत. विद्यार्थ्यांनी स्व अध्ययन करून यश मिळवले आहे. तुम्ही प्राध्यापक वर्ग का भरू शकला नाहीत. चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी भरण्यासाठी एका कंपनीला काम दिले; मात्र धाकट्याची माणसं घ्यायची की मोठ्याची? हा प्रश्न त्या कंपनीसमोर पडला असल्याचे सांगून बाळ माने यांनी सामंत बंधूंवर टिका केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button