
चिपळुणात दिवाळीच्या शुभ संध्येला भक्तीरसात रंगणार जिल्हास्तरीय भजन स्पर्धा
चिपळूण : दिवाळीच्या शुभ संध्येला चिपळूण शहरात भक्तीरसाचा उत्सव रंगणार आहे. श्री स्वामी समर्थ मित्र मंडळ, ओझरवाडी आणि शिवसेना चिपळूण शहर यांच्या संयुक्त विद्यमाने “जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा – २०२५” चे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य कार्यक्रम २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, पटांगण, चिपळूण येथे पार पडणार आहे.
या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत भजन मंडळांचा सहभाग राहणार असून पारंपरिक स्वर, वाद्य आणि भक्तिरसाची मैफल रसिकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे. दिवाळीच्या प्रकाशमय वातावरणात होणारी ही भजन स्पर्धा श्रद्धा, भक्ती आणि सांस्कृतिक ऐक्याचा सुंदर संगम घडवेल, असा आयोजकांचा विश्वास आहे.
भजन या पारंपरिक कलेतून समाजात भक्तीभाव, एकता आणि संस्कार रुजवण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे आहे. “भजनामधून भक्ती, भक्तीतून एकता” हा या स्पर्धेचा प्रमुख संदेश आहे.
भजन प्रेमी, रसिक नागरिक, मान्यवर तसेच सर्वच धर्मप्रेमींनी या भक्तिमय कार्यक्रमास उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आयोजक उमेश धोंडीराम सकपाळ (शहर प्रमुख, शिवसेना चिपळूण) यांनी आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी अनिकेत नवरत (95276 73984) यांच्याशी संपर्क साधावा.
या कार्यक्रमात शिवसेना चिपळूण शहर, महिला आघाडी, युवासेना तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्रियपणे सहभागी होणार आहेत. दिवाळीच्या आनंदसोहळ्यात भक्तीरसाचा ओघ अनुभवण्यासाठी चिपळूणकर नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




